लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नेतेमंडळी, उद्योगपती, नट-नट्या सोडाच; हल्ली गल्लीबोळातले पुढारीदेखील आलिशान गाड्यांमधून ऐटीत फिरताना दिसतात; पण अशा कैक आलिशान गाड्यांचे मॉडेल बाजारात आणणारी व्यक्ती केवळ लाखभर रुपयांच्या कारमधून फिरत असेल तर? होय, ही गोष्ट आहे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची. त्यांनी अलीकडेच मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये ‘नॅनो’ कारमधून एन्ट्री घेतली. लगेचच समाजमाध्यमांवर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि टाटांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
रतन टाटा हे मंगळवारी नॅनो गाडीतून ताज हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा सोबत ना बॉडीगार्ड होते, ना कोणतीही विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात होती.
कर्मचारीही झाले अवाक्
- अगदी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे ते या पांढऱ्या रंगाच्या कारमधून ताजच्या प्रवेशद्वारापाशी येऊन थांबले. त्यांना पाहताच हॉटेलमधील कर्मचारीही अवाक् झाले.
- स्वत:ची कार उत्पादक कंपनी, कैक कंपन्यांचे मालकी हक्क, अफाट संपत्ती आणि सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना चेहऱ्यावर अहंकार, गर्वाचा लवलेशही नसावा, हे अद्भुतच.
- रतन टाटांची जीवनपद्धती तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी या व्हिडीओवर व्यक्त केली.