मुंबई : प्रवाशांची सुरक्षा व मनमानी कारभार थांबण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूक सेवा असलेल्या अॅप बेस ओला, उबर टॅक्सींसाठी राज्य शासनाने सिटी टॅक्सी योजना लागू केली. ही योजना लागू केल्यानंतर आता उबरने चालक व प्रवाशांसाठी काही मागदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. टॅक्सीमध्ये प्रवासी महिला व पुरुष यांनी काही गैरप्रकार करण्याचा विचार केल्यास त्यावर उबरकडून कठोर मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उबरमधून प्रवास करताना चालकाला किंवा सहप्रवाशाला स्पर्श करण्यास परवानगी नाही. मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘नो सेक्स, नो फ्लर्ट’ असा नियम आहे. म्हणजेच काहीही झाले तरीही चालक आणि प्रवाशामधील कोणत्याही लैंगिक वर्तनाला परवानगी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. उबेरने जाहीर केलल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवाशांच्या आणि चालकांच्या आणखी काही वर्तणुकीवरही बोट ठेवून सूचना करण्यात आल्या आहेत. उबर वापरताना ज्या प्रकारचे वर्तन करता त्याचा तुमच्या चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षा आणि आरामदायीपणावर परिणाम होत असतो. विनम्रता ही महत्त्वाची असून, तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जसे वर्तन करता तसेच उबरचा वापर करून प्रवास करताना तुमची वर्तणूक शिष्टाचाराला धरून असावी आणि कारमध्ये इतरांशी सभ्यतेने वागावे, असे यात नमूद केले आहे. एखाद्या व्यक्तिमत्त्वावर टिपणी करण्यास या मार्गदर्शक तत्त्वानुसार नकार देण्यात आला आहे. कारमधील इतर व्यक्तींशी गप्पा मारणे साहजिकच आहे; पण एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वावर टिपणी करू नका किंवा ते एकटेच आहेत का, असे विचारू नका. एक प्रवासी म्हणून फोन करायचा असेल तर आवाज हळू ठेवा, जेणेकरून चालकाला किंवा इतर सहप्रवाशांना त्रास होणार नाही असे नमूद करत थेट कारवाईचा इशाराही दिला आहे. त्याचप्रमाणे प्रवासी उबरचा प्रवासही काही कारणांमुळे गमावू शकतो. प्रवाशांनी मुद्दामहून अन्न किंवा पेय सांडवणे, कारची मोडतोड करणे इत्ययादी प्रकारे चालकाच्या किंवा सहप्रवाशाकडील सामानाचे नुकसान करणे, चालक किंवा सहप्रवाशाला स्पर्श करणे, शिवीगाळ किंवा अपमानास्पद शारीरिक हावभाव करू नये, प्रवास झाल्यानंतरही चालक किंवा सहप्रवाशाला विनाकारण संपर्क करणे अशी कारणे आढळल्यास प्रवासी उबरचा प्रवास गमावू शकतात. (प्रतिनिधी)आणखी काही मार्गदर्शक तत्त्वेप्रवाशांनी अटींचे उल्लंघन केल्यास त्यांचे उबर अकाउंट बंद केले जाईल. चालक किंवा सहप्रवाशांप्रति त्यांचा वंश, जात, धर्म, लैंगिकता, वय, कायद्यानुसार संरक्षण देण्यात आलेल्या कोणत्याही घटकाबाबत भेदभाव दर्शविले तर अकाउंटचा अॅक्सेस गमावण्याची माहिती यातून दिली आहे. अमलीपदार्थ व दारूला तसेच शस्त्रे बाळगण्यास बंदी घातली आहे. ओला, उबरविरोधात चालक-मालकांचा मोर्चाओला आणि उबर या खाजगी कंपन्यांकडून टुरिस्ट गाड्यांच्या चालक व मालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत संघर्ष टुरिस्ट चालक मालक संघाने मंगळवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. सरकारने याप्रकरणी मध्यस्थी करून तोडगा काढला नाही, तर सर्व चालक व मालक २१ मार्चपासून बेमुदत संपावर जातील, असा इशाराही संघटनेने यावेळी दिला आहे.संघटनेचे अध्यक्ष राजु पाटील म्हणाले की, सुरूवातीला कंपनीने चालक व मालकांना करारबद्ध करताना काही आश्वासने दिली होती. त्यात मालकांना इन्सेटीव्हसह महिन्याला १ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न देण्याचे मान्य केले होते. मात्र सध्यस्थितीत गाडीचा मासिक हफ्ता भरण्याइतपत पैसेही मिळत नाहीत. संघटनेने मोर्चा काढून कंपन्यांना इशारा दिला आहे. अवाजवी दंड आकारू नये, कमाईतील २० टक्के असलेले कमिशन १० टक्क्यांपर्यंत कमी करावे, नव्याने गाड्या करारबद्ध न करता आहे त्याच गाड्यांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या संघटनेने कंपन्यांकडे केल्या आहेत. नाहीतर २१ मार्चपासून संघटना तीव्र आंदोलन करणार आहे.
‘उबरमध्ये नो सेक्स, नो फ्लर्ट’
By admin | Published: March 15, 2017 4:20 AM