ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गासाठी जागा मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 07:11 IST2024-12-27T07:11:33+5:302024-12-27T07:11:40+5:30
मुंबई पोर्टचा खोडा, प्रकल्पाचा खर्च दुप्पट होणार?

ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गासाठी जागा मिळेना
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या भुयारी मार्ग प्रकल्पात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मुंबई पोर्ट अथॉरिटीने (एमबीपीए) खोडा घातला आहे. या प्रकल्पासाठीच्या जागेच्या मोबदल्याचा तिढा सुटलेला नाही.
एमबीपीएकडून भाडेकराराने ही जागा घेण्याची अट एमएमआरडीएपुढे ठेवली आहे. त्यासाठी केवळ भूसंपादनासाठी ८,५०० कोटी मोजावे लागण्याची शक्यता एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकारी वर्तवीत आहेत. त्यामुळे आता यात राज्य सरकारने मध्यस्थी करावी, अशी विनंती एमएमआरडीए करणार आहे.
पूर्व मुक्त मार्गावरून (इस्टर्न फ्री-वे) येणाऱ्या वाहनांना थेट मरीन ड्राइव्हला आणि नरिमन पाॅइंट येथे विनाअडथळा पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीए ट्विन टनेलची उभारणी करीत आहे. या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी २०२४ ला झाले होते. तेव्हापासून एमएमआरडीए प्रकल्पासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे.
या मार्गासाठी सुमारे ४.३ हेक्टर जागा लागणार असून, यातील १.९६ हेक्टर जागा कायमस्वरूपी लागेल, तर उर्वरित जागा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर परत दिली जाणार आहे. मात्र, सद्य:स्थितीत एमएमआरडीएच्या ताब्यात केवळ १ हेक्टर जागा आली आहे. या जागेवर बोगद्यासाठी शाफ्ट उभारण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, भूसंपादनाच्या रकमेचा तिढा सुटला नसल्याने एमएमआरडीएने जागेचे पैसे अद्याप एमबीपीएला दिले नाहीत.
खर्च १६ हजार कोटींवर?
एमएमआरडीएला प्रकल्पाचा खर्च ७,७६५ कोटी असताना जागेसाठी ८,५०० कोटी मोजावे लागले, तर या प्रकल्पाचा खर्च १६ हजार कोटी रुपयांवर जाईल. त्यातून हा प्रकल्पच अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोर्टच्या पीजीएलएम पॉलिसीचा फटका
एमबीपीएने पोर्टच्या मालकीच्या जागा अन्य कंपनी अथवा आस्थापनांना देण्यासाठी २०१५ मध्ये पीजीएलएम धोरण आणले होते. या धोरणानुसार पोर्टची जागा केवळ भाडे कराराने दिली जाते. त्यानुसार ३० वर्षांसाठी १,५०० कोटी रुपये, तर ९९ वर्षांसाठी ८,५०० कोटी रुपये भाड्यापोटी मागितले आहेत. बाजारभावानुसार ही जागा खरेदीसाठी जवळपास ४५० कोटी रुपये, तर रेडी रेकनरनुसार १६० कोटी रुपयांचा खर्च येईल.
प्रकल्पाची माहिती
७,७६५ कोटी प्रकल्पाचा खर्च
९.२३ किमी एकूण लांबी
६.५२ किमी २ द्विन टनेलांची एकत्रित लांबी
भुयारी मार्गिका
दोन्ही बाजूंना प्रत्येकी ३ मार्गिका