मुंबई - गणेशोत्सवात अधिकाधिक वापर व्हावा, तसेच ओळखण्यासाठी मूर्तिकार व पर्यावरणपूरक मूर्तीचा पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांना पालिकेकडून विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार पर्यावरणपूरक मूर्तीच्या खांद्यावर मागच्या बाजूला हिरवी तर पीओपी मूर्तीवर लाल खूण करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे ग्राहकांना मातीच्या व पीओपी मूर्ती ओळखणे शक्य होईल, अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांना होती. मात्र मूर्तीवर अशा प्रकारचे शिक्के मारल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याने पालिकेने यासाठी वेगळा पर्याय शोधावा, असे सांगत पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांकडे हरकत नोंदवली आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या प्रोत्साहनासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाहू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करण्याच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, जनजागृती व्हावी म्हणून पर्यावरणपूरक व पीओपी मूर्ती यांचा फरक समजावा यासाठी पालिकेने पर्यावरणपूरक मूर्तीच्या उजव्या खांद्यावर मागे छोटे हिरवे वर्तुळ तर पीओपी मूर्तीच्या खांद्यावर मागे लाल छोटे वर्तुळ काढण्याच्या सूचना मूर्तिकारांना दिल्या होत्या. मात्र गणेशोत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
आयुक्त चहल यांच्याशी चर्चा- गणेशोत्सवाचे मुंबईत विशेष महत्त्व असून प्रत्येक व्यक्ती गणेशमूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मूर्तीवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.- पर्यावरणपूरक व इतर मूर्तीमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी बोललो आहे, असे लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
पालिका म्हणते, गणेशमूर्तीवर शिक्का मारण्याची सूचना प्राथमिक बैठकीतच रद्द■ यंदा प्रशासनामार्फत सुरुवातीलाच आयोजित समन्वय बैठकीत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या ओळखीसाठी मार्क' करण्याचा विषय चर्चेला आला. याच बैठकीत गणेशमूर्तीवर शिक्का मारला जाऊ नये, अशा सूचना प्रशासनामार्फत मूर्तिकारांना त्यावेळीच देण्यात आल्या होत्या, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.■ मूर्तिकारांनीही या सूचनेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.