लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यात मेल / एक्स्प्रेस गाड्या घाटातून सुरळीत धावाव्यात यासाठी मध्य रेल्वेने तयारी केली असून, उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार, दगड पडू नये म्हणून बोल्डर जाळी बसविण्यात आली आहे. दगड / चिखल स्लाइड रोखण्यासोबत पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला वळवण्यासाठी नवीन कॅच वॉटर ड्रेन तयार आहे. बोगद्याच्या दर्शनी भागाजवळ दगड पडणे / चिखल पडणे टाळण्यासाठी बोगद्याच्या पोर्टलचा विस्तार करण्यात येत आहे. टेकड्यांवरून विलग केलेले खडक पकडण्यासाठी डायनॅमिक रॉक फॉल बॅरियरसह इतर उपायांमध्ये १३ ठिकाणी बोल्डर कॅचिंग संप आणि १८ ठिकाणी टनेल साउंडिंगचा समावेश करण्यात आला आहे.बोगद्याची हालचाल, घाट विभागाचे विस्तृत स्कॅनिंग आणि जलमार्ग आणि झाडे साफ करणे यासाठी डोंगरावर टीम तैनात आहेत. हिल गँग संघासाठी व्यावसायिक प्रशिक्षकांद्वारे विशेष प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. सल्लागारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही जागेची नियमित पाहणी करण्यात आली आहे. आयआयटी मुंबई आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तज्ञांशी सल्लामसलत करून उपाय योजले गेले आणि अंमलात आणले गेले आहेत. शिवाय मध्य रेल्वेचे नियंत्रण कार्यालय चोवीस तास कार्यरत असून, हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या सोबत समन्वय ठेवला जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.