"जरांगेंचा अभ्यास नाही, कुणबी प्रमाणपत्र नको"; राणेंनंतर कदमांचाही विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 04:29 PM2023-10-22T16:29:26+5:302023-10-22T16:30:46+5:30
मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा.
मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला असून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज एकटवला आहे. त्यातच, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी समाजाच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र, आता काही मराठा समाजातील नेत्यांनी या मागणीला थेट विरोध दर्शवला आहे. भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आता शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनीही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको असल्याचं म्हटलंय. कोकणतील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पत्र परिषदेत व्यक्त केले होते. त्यानंतर, राणेंची री ओढत आता कोकणातील आणखी एका नेत्याने कुणबी प्रमाणपत्राला थेट विरोध केला आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीलाही विरोध दर्शवला आहे. कोकणात कुणबी आणि मराठा यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार चालत नाही, हे जरांगे पाटलांना माहिती नाही. त्यांचा कोकणाचा, महाराष्ट्राचा अभ्यास तेवढा नाही. कोकणातला एकही मराठा कुणबी दाखला घेणार नाही, हे मी दाव्याने सांगतो, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता राणेंनंतर कदमही कुणबी प्रमाणपत्राला थेट विरोध करत आहेत.
काय म्हणाले होते राणे
राणे म्हणाले की, राज्य सरकारला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगे यांनी अभ्यास करावा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. ९६ कुळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. जरांगे म्हणतात तसे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
जरांगे पाटलांचं राणेंना प्रत्त्युत्तर
मनोज जरांगे पाटील यांनी आज नारायण राणे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आरक्षण मागत आहेत. कुणबी घेण्याला काही वाईट नाही, कुणबी म्हणजे शेती, आमचा बाप शेती करतो मग तो श्रीमंत मराठा असला तरीही शेती करतो. जे जमिनीवर राहणार नाहीत, मायभूमीत राहणार नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये, असंही जरांगे पाटील म्हणाले.
२५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण
शासनाने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी आरक्षण द्यावे. अन्यथा २५ तारखेनंतर सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि २८ ऑक्टोबरपासूनचे आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शांततेचे युद्ध काय असते हे सरकारला आणि देशाला दाखवून देवू असेही ते म्हणाले.