Join us

साथ नाही; पण रुग्ण वाढले...नेत्रविकारांच्या तक्रारींमध्ये वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 5:16 AM

डोळ्यांची साथ आली नसली तरी डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे रुग्ण वाढत असल्याचे सध्या चित्र आहे.

मुंबई :  डोळ्यांची साथ आली नसली तरी डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे रुग्ण वाढत असल्याचे सध्या चित्र आहे. नेत्रविकारतज्ज्ञांच्या मते दरवर्षी या काळात डोळ्याचे रुग्ण पाहायला मिळतात. वैद्यकीय भाषेत याला व्हायरल कंजंक्टिव्हायटिस असे म्हणतात. यामध्ये काही नागरिकांना डोळे लाल होऊन चुरचुरण्याचा त्रास झाल्याचे रुग्ण पाहावयास मिळत आहेत.  हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांनी तसेच त्याच्या कुटुंबीयांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत नेत्रविकारतज्ज्ञांनी व्यक्त केली. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांत नेत्रविकारांचे रुग्ण वाढले आहेत. 

डोळ्याचा संसर्ग याला सामान्य भाषेत डोळे येणे असे म्हटले जाते. हा आजार चार ते पाच दिवस राहतो. डॉक्टरांच्या मते जिवाणूचा संसर्ग असेल तर मध्ये डोळा लाल होतो आणि पिवळा द्रव वाहतो.  या पद्धतीचा रुग्ण साधारणपणे  योग्य औषधोपचारनंतर ४-५ दिवसांत बरे होतात. विषाणूचा संसर्ग होऊन डोळे आले असतील तर त्यासाठी ७ ते ८ दिवस लागण्याची शक्यता आहे. फार्मासिस्टच्या  सल्ल्यानुसार कोणेतेही ड्रॉप्स घालू नये. कारण त्याच्यामध्ये आवश्यकता नसताना स्टिरॉईड आणि अँटिबायोटिक्स असण्याची शक्यता आहे. 

सध्याच्या घडीला खासगी प्रॅक्टिसमध्ये दररोज दोन रुग्ण डोळा आला या आजराचे पाहत आहे. सार्वजनिक रुग्णालयात याची संख्या निश्चितच जास्त असेल. नागरिकांनी काही घाबरून जाण्याची गरज नाही. विश्रांती घेऊन योग्य उपचार घ्या. - डॉ. शशी कपूर, नेत्रविकारतज्ज्ञपावसाळा सुरू झाला की डोळे येण्याच्या तक्रारी वाढतात. पूर्वी आम्ही चार  ते पाच रुग्ण आठवड्याला पाहत होतो, सध्याच्या घडीला आम्ही रोज चार ते पाच रुग्ण पाहत आहोत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.  यामध्ये नागरिकांना जिवाणू  (बॅक्टेरियल) आणि विषाणू (व्हायरल) या दोन्ही प्रकारचा डोळ्यांचा संसर्ग होऊ शकतो. विशेष म्हणजे घरातील दुसऱ्या एखाद्या सदस्याचे डोळ्याचे उरलेले औषध डोळ्यात टाकू नका, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते.- डॉ. चारुता मांडके, प्रभारी विभागप्रमुख, नेत्रविकारतज्ज्ञ, कूपर रुग्णालय