सहानुभूती नको सहयोग हवा...

By admin | Published: October 15, 2015 02:11 AM2015-10-15T02:11:55+5:302015-10-15T02:11:55+5:30

अंध म्हटले की सगळ्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होते. मात्र आज स्वकर्तृत्वावर आणि जिद्दीवर सर्व स्तरांवर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या दृष्टीहीन मुलांना कुणाचीही सहानुभूती नकोय

No sympathy, no cooperation ... | सहानुभूती नको सहयोग हवा...

सहानुभूती नको सहयोग हवा...

Next

महेश चेमटे, मुंबई
अंध म्हटले की सगळ्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होते. मात्र आज स्वकर्तृत्वावर आणि जिद्दीवर सर्व स्तरांवर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या दृष्टीहीन मुलांना कुणाचीही सहानुभूती नकोय; तर सहयोग पाहिजे आहे.
जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने अंध मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या अशाच काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचा आणि अंध मुलांच्या कामगिरीचा ‘लोकमत’ने घेतलेला हा खास आढावा वाचकांसाठी.
वांद्रे येथे राहणाऱ्या नेहा पावसकर यांनी ‘आॅल इंडिया अंध स्त्रीहित असोसिएशन’ची स्थापना केली; ती अंधांना आधार देण्यासाठी. अंध व अपंग मुलांना साहसी खेळाचा अनुभव घेता यावा आणि विविध खेळांच्या माध्यमातून त्यांना आयुष्याचा आनंद उपभोगता यावा या उद्देशाने त्यांनी संस्थेचे काम सुरू केले. संस्थेतर्फे अंध मुलांना साहसी खेळ, ज्युडो, तायक्वांदो या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
नुकत्याच साऊथ कोरियामध्ये पार पडलेल्या ब्लाइंड इंटरनॅशनल ज्युडो स्पर्धेत महाराष्ट्राने कांस्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या संघातून या संस्थेत शिकलेल्या प्रियंका घुमरे आणि जयदीप सिंग यांनी नेत्रदीपक यश मिळवले. यापेक्षाही पुढे जात कृष्णा शेथ या १० वर्षीय अंध मुलाने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत डोळस मुलांच्या गटात रौप्य पदकावर नाव कोरले. नयन फाउंडेशन हे महाराष्ट्रातील पहिले अंध गोविंदा पथक. तिसऱ्या वर्षात पदार्पण करणारे हे फाउंडेशन दहीहंडीतून बक्षीसरूपी प्राप्त रकमेपासून विविध उपक्रम आखतात.
वैभवशाली इतिहास अनुभवण्यासाठी गड-किल्ल्यांच्या भटकंतीपासून मेंदूला चालना देण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धा असे विविध उपक्रम संस्थेचे अध्यक्ष पुन्न अलगर देवेंद्र यांच्याकडून वर्षभर राबविले जातात. स्वत: अंशत: अंध असलेल्या पुन्न अलगर यांना या कामात त्यांच्या सर्व मित्रांची डोळस साथ लाभते आहे. आर्थिक चणचण भासत असल्याने संस्थेच्या बैठका रुईया महाविद्यालयासमोरील पार्किंगमध्ये पार पडतात.
४ जानेवारी हा दिवस लुई ब्रेल दिन म्हणून नावारूपास आहे. याच दिवसाचे औचित्य साधून सचिन माने यांनी नेत्रदीप प्रतिष्ठानची स्थापना केली. आजच्या स्पर्धेच्या युगात आपणही मागे नाही, यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्याख्याने आयोजित केली जातात.
केवळ व्याख्यानेच नाही तर स्पर्धेच्या दिवशी रायटर म्हणून अनेक कार्यकर्ते आपला क्रियाशील सहभाग नोंदवतात; तेही कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता. शिवाय स्पर्धा परीक्षांसाठीच्या प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धेचे कार्यक्रमही संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात.

Web Title: No sympathy, no cooperation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.