ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई
By नितीन जगताप | Published: January 18, 2023 06:16 AM2023-01-18T06:16:36+5:302023-01-18T06:16:36+5:30
सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाची निविदा येत्या १६ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
नितीन जगताप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सरकारच्या अखत्यारितील एखाद्या प्रकल्पाचे काम करायचे झाल्यास त्याची आधी निविदा निघते. स्पर्धात्मक बोली मागविल्या जातात. त्यातील कमीत कमी बोलीच्या निविदेला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर यथावकाश कार्यारंभ आदेश निघतात आणि त्यानंतर संबंधित प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होते. तत्पूर्वी प्रकल्पस्थळाचे भूमिपूजन केले जाते. मात्र, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाची मध्य रेल्वेला प्रचंड घाई झाली असून आधी प्रकल्पाचे भूमिपूजन नंतर निविदा, असा उलटा क्रम अवलंबिण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याचा मुहूर्त साधत सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचे घाटत आहे. सीएसएमटीचा सध्याचे वैभव जतन करत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचे पुनर्विकास प्रकल्पात प्रस्तावित आहे. वस्तुत: १८१३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची निविदा १६ फेब्रुवारीला खुली होणार आहे. या निविदा प्रक्रियेत ठराविक बोली न मिळाल्यास पुन्हा नव्याने निविदा मागविण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर येऊ शकते. निविदा निश्चित नसताना दुसरीकडे मध्य रेल्वेला पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनाची घाई का, सवाल उपस्थित केला जात आहे.
पुनर्विकासात काय?
- सीएसएमटी स्थानकाचे गतवैभव जतन केले जाणार
- सर्व प्रवासी सुविधांसह विक्रेते, कॅफेटेरियासाठी जागा, पादचारी पूल रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठी जास्त ठिकाणे
- पार्किंगची सुविधा, रूफ प्लाझा आधुनिक सुविधांयुक्त प्लॅटफॉर्म, लिफ्ट/ एस्केलेटर/ ट्रॅव्हेलेटरची सुविधा, दिव्यांगजनांसाठी सुविधा, सौरऊर्जा, जलसंवर्धन / पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन
- एकूण ३६ हेक्टर जागेत पुनर्विकास
निवडणुकांच्या तोंडावर उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे. पण निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अगोदर उदघाटन करणे अयोग्य आहे. असे करणे मध्य रेल्वेच्या अंगलट येऊ शकते. -नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ