मुंबई -
सावलीप्रमाणे सतत सोबत असलेला मोबाईल गहाळ झाला तर जीवाची घालमेल होते. पोलीस ठाण्यात तक्रार केली तरी मोबाईल परत मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. पण तुमचा मोबाईल बेस्ट उपक्रमाच्या बसमध्ये हरवला असल्यास चिंता करु नका. फेब्रुवारी महिन्यात बेस्ट बसगाड्यांमध्ये गहाळ झालेले मोबाईल त्यांना परत मिळवता येणार आहे.
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमधून दररोज सरासरी २८ लाख प्रवाशी प्रवास करतात. यापैकी अनेकवेळा घाईगडबडीत प्रवाशी आपल्या वस्तू बसमध्येच विसरुन जातात. या वस्तू बस वाहकांमार्फत आगारांमध्ये जमा केल्या जातात. यामध्ये अनेकवेळा मौल्यवान वस्तूंचाही समावेश असतो. संबंधित प्रवाशांना पुराव्यासह ती वस्तू आपली असल्याचे सिद्ध करुन त्यावर दावा करता येतो. मात्र यावेळेस बेस्ट बसगाड्यांमध्ये मोबाईल फोन मोठ्याप्रमाणात सापडले आहेत. ३१ जानेवारीपासून २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधी ३७ मोबाईल बेस्टकडे जमा झाले आहेत.
बेस्ट उपक्रमाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन गहाळ किंवा बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मोबाईल फोन बसमध्ये साडपल्याचा दिनांक, बसक्रमांकाचा मार्ग, मोबाईल फोन कोणत्या कंपनीचा आहे? अशी माहिती समाविष्ट आहे. त्यामुळे संबंधितांनी तातडीने बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधून त्यांचा मोबाईल १३ एप्रिल २०२२ पूर्वी ताब्यात घ्यावे, असे आवाहन बेस्टने केले आहे. गहाळ वस्तूंची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या bestundertaking.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.