मुंबईकरांना दुधाचे ‘नो टेन्शन’!, दोन दिवस पुरेल इतका साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:47 AM2018-07-19T04:47:19+5:302018-07-19T04:47:31+5:30
मुंबईकरांना दूधपुरवठा करणाऱ्या शासनाच्या ‘आरे’ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या ‘महानंद’ उपक्रमाने पुढील दोन दिवस पुरेल इतका दुधाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे.
- चेतन ननावरे
मुंबई : मुंबईकरांना दूधपुरवठा करणाऱ्या शासनाच्या ‘आरे’ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या ‘महानंद’ उपक्रमाने पुढील दोन दिवस पुरेल इतका दुधाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. आंदोलन अधिक चिघळू लागल्याने मुंबईकरांकडून दुधाची जादा खरेदी होत असूनही वितरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे दूध कंपन्यांनी सांगितले आहे. महानंदचे दूध डेअरी विभागाचे उपव्यवस्थापक शिवाजी वाघ म्हणाले, गोरेगाव दुग्धशाळेमध्ये ३ लाख ९ हजार लीटर दुधाचा साठा आहे. वैभववाडी, पुणे, लातूर, नागपूर येथील दुग्धशाळांचा साठा धरून तूर्तास ३ लाख ८७ हजार लीटर दूध उपलब्ध आहे. बुधवारी रात्रीही ६० हजार लीटर दूध गोरेगावच्या दुग्धशाळेत दाखल झाले. गुरुवार आणि शुक्रवारी सकाळपर्यंत कमतरता भासणार नाही. अद्यापपर्यंत शासनाच्या दूधपुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचे एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
>वसई-विरारमध्ये
दूध महाग
विरार : दूध संपामुळे बुधवारी ताजे दूध बाजारात आले नाही. बाजारातील जुना साठा संपत आल्याने दूध ४ ते ५ रु पयांनी महागले.
>राजू शेट्टींचा वसुंधरासमोर ठिय्या
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील वसुंधरा या कारखान्यात येणारे व प्रक्रिया होऊन जाणारे दूध रोखून धरण्याकरिता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कारखान्याच्या प्रवेश द्वारासमोर बुधवार संध्याकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात तिसºया दिवशी बुधवारी आष्टी (जि. बीड) येथे दूध उत्पादक शेतकºयांनी एकाला दुग्धस्नान घातले.
>ग्राहकांकडून जादा दूध खरेदी
शेतकरी संघटनांकडून दूध आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात दूध खरेदी सुरू असल्याचे चित्र मुंबईत आहे. त्यामुळे दुधाचा तुटवडा नसला, तरी काही दुकानांवर दुधाची उपलब्धता नसल्याचेही दिसून येत आहे.
...तर गोकुळच्या ग्राहकांना फटका बसणार!
मुंबई व ठाण्यामध्ये गोकुळ दुधाचे सरासरी ६ लाख लीटर वितरण होते. बुधवारी सकाळपर्यंत वितरण व्यवस्थित सुरू असल्याची माहिती गोकुळच्या वितरण कार्यकारी समितीचे सदस्य कृष्णा पाटील यांनी दिली. कोल्हापूरहून बुधवारी रात्री दुधाचे टँकर आले नाहीत, तर मुंबई व ठाण्यातील ५० टक्के ग्राहकांनाच गुरुवारी वितरण करता येईल, असे त्यांनी सांगितले.
>पोलीस बंदोबस्तात दुधाच्या गाड्या रायगडात
नागोठणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून पश्चिम महाराष्ट्रात चालू केलेल्या आंदोलनामुळे रायगड जिल्ह्यात काही अंशी दूधटंचाई निर्माण झाली होती. मात्र, मंगळवारी रात्री दुधाच्या गाड्या पोलीस बंदोबस्तात लोणावळ्यापर्यंत आणून पुढे या गाड्या रायगडात आणल्या गेल्या. त्यामुळे बुधवारपासून रायगड जिल्ह्यात दूधपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती रायगड जिल्हा दूध विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश परमार यांनी दिली.