रात्रीच्या प्रवासाचे ‘नो टेन्शन’
By admin | Published: December 16, 2015 02:32 AM2015-12-16T02:32:44+5:302015-12-16T02:32:44+5:30
हार्बर, ट्रान्स हार्बरवरील लोकल प्रवाशांना रात्रीच्या लोकल प्रवासाचे टेन्शन घेण्याची गरज नाही. नवीन वर्षापासून या दोन्ही मार्गांवरील रात्री शेवटच्या व पहाटे पहिल्या लोकल वेळेत काही प्रमाणात
मुंबई : हार्बर, ट्रान्स हार्बरवरील लोकल प्रवाशांना रात्रीच्या लोकल प्रवासाचे टेन्शन घेण्याची गरज नाही. नवीन वर्षापासून या दोन्ही मार्गांवरील रात्री शेवटच्या व पहाटे पहिल्या लोकल वेळेत काही प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेलहून सुटणाऱ्या शेवटच्या लोकल वेळेत चार मिनिटांनी तर पनवेलहून ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकलची वेळ तब्बल १ तास २६ मिनिटांनी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे तसेच सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
मध्य रेल्वेकडून जानेवारीपासून ४१ नवीन फेऱ्या चालवितानाच १६ जुन्या फेऱ्यांचा विस्तार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे महिला प्रवाशांच्या सोयीसाठी महिला विशेष लोकलच्या वेळेतही बदल करण्यात येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर पनवेलहून सीएसटी तसेच ठाण्यासाठी रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना लोकल पकडता यावी यासाठी शेवटच्या लोकल वेळेतही बदल करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. पनवेलहून सीएसटीसाठी शेवटची लोकल २३.५९ वाजता सुटते. आता हीच लोकल 00.0३ वाजता सोडण्यात येईल. ठाणे ते पनवेल दरम्यानही धावणाऱ्या पहिल्या व शेवटच्या लोकल वेळेत बदल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल सकाळी ६.२0 वाजता सुटते. हीच लोकल सकाळी सव्वापाच वाजता सोडण्यात येईल. त्याचप्रमाणे ठाण्याहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री २२.५२ वाजता सोडण्यात येत असून ती जानेवारीपासून 00.0५ वाजता सुटेल. महत्त्वाची बाब म्हणजे पनवेलहून रात्री ठाण्याकडे
येण्यासाठी असणाऱ्या शेवटच्या लोकल वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. पनवेलहून ठाण्यासाठी रात्री २१.५२ वाजता लोकल सोडण्यात येते. याच लोकलच्या वेळेत १ तास २६ मिनिटांनी वाढ करण्यात येणार असून ती २३.१८ वाजता सुटणार
आहे. (प्रतिनिधी)