मुंबई : मध्य रेल्वेने कर्नाक उड्डाणपूल पाडकामासाठी २७ तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे शनिवार १९ नोव्हेंबर रात्रीपासून २१ नोव्हेंबरपर्यंत सीएसएमटी ते भायखळा रेल्वे गाड्या धावणार नाहीत. या जम्बो ब्लॉकदरम्यान रात्री उशिरा कामावरून सुटणाऱ्या अथवा ड्यूटीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने यादरम्यान जादा बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी मस्जिद ते सीएसएमटीदरम्यान २७ तासांचा जम्बो ब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १९ ते २१ नोव्हेंबर २०२२ पर्यतच्या कालावधी घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही.
१९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० ते २० नोव्हेंबरपर्यंत सकाळी ६.३० पर्यंत वडाळा, कुलाबा आणि सेंट्रल या आगारातून १२ बसेसच्या फेऱ्या तर रविवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कुलाबा-धारावी प्रतीक्षा नगर, बॅकबे, वडाळा, सेंट्रल व आणिक आगारातून ३५ बसेस धावणार आहेत.
अशा धावणार बसेस शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत, सीएसएमटी-वडाळा, सीएसएमटी-दादर आणि भायखळा (प), कुलाबा (प्रत्येक मार्गावर चार अतिरिक्त बस) यासह तीन मार्गांवर १२ जादा बसेस बेस्टकडून चालवल्या जातील. तसेच रविवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत इलेक्ट्रिक हाऊस-वडाळा (प), सीएसएमटी-धारावी डेपो, मुखर्जी चौक-प्रतीक्षा नगर, मंत्रालय-माहुल, इलेक्ट्रिक हाउस-के सर्कल आणि अँटॉप हिल-कोतवाल उद्यान या मार्गावर ३५ जादा बस सोडण्यात येणार आहेत.