मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा जलाशयांची पाणीपातळी खालावली असली तरीही साधारणतः १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. यंदा पावसाळा वेळेवर सुरू होऊन समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे तूर्तास तरी मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज तीन हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या या धरणांत केवळ २०. २८ टक्के पाणीसाठा आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधील सुमारे दोन लाख ९३ हजार ५५२ लिटर पाणी आणि राखीव जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरावा लागणार आहे. सध्या पालिकेने पाणीकपात लागू केलेली नाही.
अतिरिक्त पाणीसाठा
• सात जलाशयांपैकी राज्य सरकारच्या अखत्यारितील अप्पर वैतरणा आणि भातसा ही मोठी धरणे आहेत.
• अप्पर वैतरणात दोन लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर पाणी साठवण क्षमता असून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर पाणीसाठा राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे.
• भातसाची पाणी साठवण क्षमता ही सात लाख १७ हजार ३७ असून, त्यातून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
मोडक सागर मध्य वैतरणा अप्पर
मे महिन्यात निर्णय?
पावसाळा सुरू होईपर्यंत धरणांतील उपलब्ध साठाआणि राखीव साठ्यातील पाण्याचे नियोजन करूनच पाणी पुरवावे लागणार आहे. मात्र, मे महिन्यात धरणांतील जलसाठ्याचा आढावा घेऊन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येईल. त्यावेळच्या परिस्थितीनुसार पाणी कपात करायची का, किती टक्केकरायची? जलतरण तलावांच्या पाणीवापरावर निर्बंध घालायचे का, याबाबत मे महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.