वीज ग्राहकांना सेवाशुल्काचे नो टेन्शन!
By admin | Published: August 1, 2014 02:56 AM2014-08-01T02:56:04+5:302014-08-01T02:56:04+5:30
स्वस्त विजेसाठी एका वीज कंपनीकडून दुसऱ्या वीज कंपनीकडे उडी मारणाऱ्या चेंज ओव्हर आणि स्वीच ओव्हर वीज ग्राहकांना आता सेवाशुल्क भरावे लागणार नाही
मुंबई : स्वस्त विजेसाठी एका वीज कंपनीकडून दुसऱ्या वीज कंपनीकडे उडी मारणाऱ्या चेंज ओव्हर आणि स्वीच ओव्हर वीज ग्राहकांना आता सेवाशुल्क भरावे लागणार नाही. टाटा पॉवर कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगाने वीज ग्राहकांना सेवा शुल्कातून सूट देण्यावर शिक्कामोर्तब केल्याने वीज ग्राहकांना हा दिलासा मिळाला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, टाटा, रिलायन्स आणि महावितरण अशा चार वीज कंपन्या वीजपुरवठा करत आहेत. सद्य:स्थितीत मुंबई शहरात बेस्ट तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात टाटा, रिलायन्स आणि महावितरण वीजपुरवठा करत आहे. चारही वीज कंपन्यांमध्ये टाटा पॉवरची वीज स्वस्त असून, रिलायन्सचे लहान ग्राहक आपल्याकडे खेचण्यावरून या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये शीतयुद्ध रंगले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टाटा पॉवर कंपनीला मुंबई शहरात वीजपुरवठा करण्याची परवानगी मिळाली असली तरी येथे वीजपुरवठ्याचे जाळे उभारण्यासाठी कंपनीला पावसाळा संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना स्वस्त विजेसाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र तरीही टाटा पॉवर मुंबई शहरातील बेस्टच्या ग्राहकांनाही आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील असून, सेवाशुल्काबाबत कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती.
मुळात वीज ग्राहक जेव्हा विजेची जोडणी घेतात तेव्हा त्यांनी संबंधित वीज कंपनीला सेवाशुल्क अदा केलेले असते. परिणामी, स्वस्त वीज घेताना पुन्हा सेवाशुल्क दर भरण्याबाबत ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येते. या कारणास्तव स्वीच ओव्हर आणि चेंज ओव्हर वीज ग्राहक जेव्हा एका वीज कंपनीकडून दुसऱ्या वीज कंपनीकडे वळते होतील; तेव्हा त्या ग्राहकांना सेवाशुल्काबाबत दिलासा देण्यात यावा अशी याचिका टाटा पॉवरने दाखल केली होती.
वीज ग्राहकांवर सेवाशुल्काचा बोजा पडू नये अशी कंपनीची भूमिका होती. यावर आयोगाने शिक्कामोर्तब करत वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)