मुंबई : जून-जुलै या दोन महत्त्वाच्या महिन्यांतच दांडी मारून पावसाने मुंबईकरांचा जीव टांगणीला लावला. मात्र, मागील काही दिवसांत मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व तलाव काठोकाठ भरली आहेत. याउलट मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा जमा झाला आहे.
जुलै महिन्याच्या पंधरवड्यात सर्व तलावांमध्ये मिळून केवळ १७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तलाव क्षेत्रात चांगला जलसाठा जमा होऊ लागला. पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली. पावसाळी चार महिने असेच चित्र कायम राहिल्याने टेन्शन वाढले होते. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. मात्र, यावर्षी मागील काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे तलाव क्षेत्रात आता ९९.२२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. पुढील वर्षभर मुंबईकरांना पाण्याची चिंता करावी लागणार नाही, इतका हा जलसाठा आहे.
* वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठा जमा असणे अपेक्षित असते.
* महापालिकेमार्फत मुंबईत दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
आकडेवारी(दशलक्ष लिटर)
२० सप्टेंबर २०२१
वर्ष.... सध्याचा जलसाठा....टक्केवारी
२०२१- १४३६१२६-...९९.२२
२०२०- १४२२६०२-...९८.२९
२०१९- १४१६१७७-...९७.८५
जलसाठ्याची आकडेवारी(मीटर्समध्ये)
तलाव- कमाल - किमान- उपायुक्त साठा (दशलक्ष)- सध्या
मोडक सागर १६३.१५- १४३.२६- १२८९१०- ....१६३.१२
तानसा- १२८.६३- ११८.८७- १४३८२८- ...१२८.५६
विहार- ८०.१२- ७३.९२- २७६९८-.....८०.०७
तुळशी - १३९.१७ - १३१.०७ - ८०४६ - ..१३९.३३
अप्पर वैतरणा- ६०३.५१ - ५९५.४४- २२५६०१-...६०३.४७
भातसा- १४२.०७ - १०४.९०- ७१३४७१- ...१४१.९४
मध्य वैतरणा- २८५.००- २२०.००- १८८५७३-....२८४.०६