यंदा मुंबईकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’; जुलैपर्यंत पुरेल एवढा साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:35 AM2020-05-08T02:35:15+5:302020-05-08T07:07:28+5:30
पाणीकपात नाही होणार
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कडक उन्हाची झळ सध्या मुंबईकरांना बसत आहे. मात्र या संकटाच्या काळातही मुंबईसाठी एक बाब दिलासा देणारी आहे. तलाव क्षेत्रात पुरेसा जलसाठा असल्याने यंदा नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा साठा आहे.
मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून हा पाणीपुरवठा होत असतो. मात्र २०१८ मध्ये पाऊस कमी झाल्यामुळे गत वर्षी मुंबईकरांना काही काळ पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. सुदैवाने गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्यामुळे तलावांमध्ये मुबलक जलसाठा जमा झाला. सध्या तलाव क्षेत्रात एकूण तीन लाख ९० हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. गतवर्षी मे महिन्यात जेमतेम १५ ते १८ टक्के जलसाठा तलावांमध्ये होता. मात्र यावर्षी आणखी तीन महिने म्हणजे जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा असल्याने यावर्षी पाणीकपात करण्याची वेळ पालिकेवर येणार नाही. त्यामुळे कोरोनारूपी संकटामुळे सध्या बेजार झालेल्या मुंबईकरांना यंदा पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.
गळतीमुळे जाते पाणी वाया!
मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यापैकी सुमारे नऊशे दशलक्ष लीटर चोरी तसेच गळतीमुळे वाया जाते. वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाणी असणे आवश्यक असते.
लॉकडाउनमुळे पाण्याची बचत
मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १०० ते १५० किमीवरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते. हे पाणी २४ विभागांतील टेकड्यांवरील भूमिगत जलाशयांतून त्या-त्या विभागात पुरविण्यात येते. मात्र सध्या लॉकडाउनमुळे उद्योगधंद्याला लागणारे १५ टक्के पाणी टाक्यांमधील राखीव कोट्यात शिल्लक राहत आहे. याचा लाभ मुंबईकरांना होणार आहे.
२०१८मध्ये तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करावी लागली होती. २०१९मध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर जुलै २०१९मध्ये पाणीकपात रद्द करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांची स्थिती पाहता यावर्षी मुंबईकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपात करावी लागणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.