Join us

पुन्हा लॉकडाऊनबाबत अद्याप कुठलाही विचार नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 2:44 AM

कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली; राज्य ‘सुरक्षित झोन’ मध्ये 

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या काही आठवड्यात लक्षणीयरीत्या कमी झाली असून पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत राज्य शासनाचा अद्याप कुठलाही विचार नाही, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. राज्य आज ‘सुरक्षित झोन’ मध्ये आहे. रुग्णवाढीचा राष्ट्रीय दर ०.४ टक्के इतका असताना आपल्याकडे तो ०.२ टक्के इतकाच आहे. आपण आधी दररोज ९० हजार चाचण्या करीत होतो. दिवाळीच्या दिवसांत ते प्रमाण २५ हजारांवर आले पण आता पुन्हा ९० हजार चाचण्या दररोज केल्या जात आहेत, परिणामत: कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. पंतप्रधानांनीही चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्याना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली. परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या आठ-दहा दिवसांत लॉकडाऊनबाबतचा निर्णय शासन घेईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी म्हटले होते. स्वत: टोपे यांनीदेखील तसे संकेत दिले होते. मात्र, कडक लॉकडाऊनची स्थिती सध्यातरी नाही असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सूचित केले. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला तेव्हा महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमीकमी होत आहे याची आकडेवारी त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या