नको तिकीटाची झंझट; स्मार्ट बँड घालून करा मुंबई मेट्रोचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:56 PM2024-04-11T12:56:05+5:302024-04-11T12:57:29+5:30

तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका

No ticket hassle; Wear a smart band and travel on the Mumbai Metro | नको तिकीटाची झंझट; स्मार्ट बँड घालून करा मुंबई मेट्रोचा प्रवास

नको तिकीटाची झंझट; स्मार्ट बँड घालून करा मुंबई मेट्रोचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : वर्सोवा - घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर सतत तिकीट काढण्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. हातात घातलेल्या स्मार्ट बँडच्या (रिस्टबँड) साहाय्याने प्रवाशांना तिकिटाविना प्रवास करणे शक्य होणार आहे. मुंबईमेट्रो वन प्रशासनाने (एमएमओपीएल) हातात घालता येईल, अशा टॅप-टॅप विअरेबल तिकीट बुधवारी लाँच केले.

मनगटावर परिधान केलेले स्मार्ट बँड मेट्रोस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील एएफसी गेटवर स्कॅन करताच प्रवाशांना स्थानकात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट हातात बाळगण्याची किंवा मोबाइलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून स्थानकात प्रवेश करण्याची गरज पडणार नाही. प्रवाशांना हा स्मार्ट बँड  २०० रुपयांना मिळणार असून, ते रिचार्ज करता येणार आहे. 

हे तिकीट नावीन्यपूर्ण 
हे नावीन्यपूर्ण तिकीट मुंबई मेट्रो वन स्थानकांच्या सर्व ग्राहक सेवांमध्ये उपलब्ध केले आहे, अशी माहिती मेट्रो वन प्रशासनाने दिली. हे तिकीट पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केले आहे, तसेच ते बॅटरीशिवाय चालत असून, जलरोधक आणि सहज वापरता येण्याजोगे आहे, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

वेळेची होणार बचत
n मेट्रो वन मार्गिका सुरू झाल्यापासून गेल्या १० वर्षांत ९५० दशलक्ष प्रवाशांनी या मार्गिकेवरून प्रवास केला आहे. सद्य:स्थितीत मेट्रो वन मार्गिकेवर दरदिवशी ४१८ फेऱ्या होत असून, त्या माध्यमातून सुमारे ४ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. 
n मेट्रो वनने प्रवाशांच्या सोयीसाठी कॉम्बो कार्ड, मोबाइल क्यूआर तिकीट, लॉयल्टी रिवार्ड्स प्रोग्राम, प्रवास पास यासारख्या सुविधा दिल्या आहेत, तसेच काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सॲप 
ई-तिकीटची सुविधा दिली आहे. 
n आता हातातील बँडद्वारे तिकीट काढण्याची सुविधा प्रदान केल्यामुळे प्रवाशांच्या वेळेची आणखी बचत होणार आहे.

२.८५ 
लाख प्रवासी ‘स्मार्ट’
सद्य:स्थितीत मेट्रो १ मार्गिकेवरून २ लाख ८५ हजार प्रवाशांकडून डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करून प्रवास केला जात आहे. त्यामध्ये ९० हजार प्रवासी मोबाइल क्यूआर कोड प्रणालीचा वापर करत आहेत. आता स्मार्ट बँड पद्धत लागू केल्याने डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल, अशी आशा मेट्रो वनकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: No ticket hassle; Wear a smart band and travel on the Mumbai Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.