कोस्टल रोडसाठी झाडे अजिबात तोडायची नाहीत, कांदिवलीकरांचा प्रशासनाला इशारा! ऐकलं नाही तर आंदोलन करणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:12 IST2025-03-11T15:11:53+5:302025-03-11T15:12:54+5:30
कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा-दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीत ३००हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे.

कोस्टल रोडसाठी झाडे अजिबात तोडायची नाहीत, कांदिवलीकरांचा प्रशासनाला इशारा! ऐकलं नाही तर आंदोलन करणार...
कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा-दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीत ३००हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आमदार संजय उपाध्याय यांनी स्थानिक व पालिका अधिकाऱ्यांसह शनिवारी बैठक घेतली. यावेळी ३३७ पैकी इमारतींनजिकची असणारी १९० झाडे तोडली जाणार नाहीत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. मात्र झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर समाधान न झाल्याने स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता पालिका अधिकारी, स्थानिक नागरिक आणि आमदार हे लवकरच संयुक्तपणे पाहणी करुन यावर निर्णय घेणार आहेत.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत झटपट पोहोचता यावे, यासाठी कोस्टल रोड टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. स्थानिक रहिवाशांनी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. यामुळे वर्सोवा-दहिसर टप्पा बांधताना येथील झाडे तोडण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.
गेली अनेक वर्षे ही झाडे परिसरात तग धरुन आहेत. अधिकाऱ्यांनी बैठकीत आम्हाला समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे जर याबाबत तोडगा निघाला नाही तर आम्ही आंदोलन करु.
- मिली शट्टे, पर्यावरणप्रेमी
आम्ही लवकरच यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करुन सर्वेक्षण करणार आहोत. पालिकेला झाडांच्या पुनर्रोपण प्रक्रियेबाबत पुनर्विचार करण्यासही सांगितले आहे. याबाबत निसर्गाची हानी होणार नाही. असा शक्य तितका प्रयत्न आम्ही करु
- आमदार संजय उपाध्याय, बोरिवली
झाडे जगतील का?
बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार इमारतीपासून ३० फूट अंतरावर असलेली झाडे कापण्यात येतील आणि खारफुटी संरक्षणासाठी असेलल्या भिंती पाडण्यात येतील. मात्र, पुनर्रोपण केलेली झाडे जगतील का? शिवाय पार्किंगची जागा, स्कूल बसची वाहतूक एवढ्या अरुंद जागेत कशी होईल, असा प्रश्न स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.