Join us

शासनाकडून कोरोनासाठी अद्याप एकही व्हेंटिलेटरची खरेदी नाही;पुरवठ्यासाठी लागणार किमान अडीच महिन्यांचा अवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:12 AM

हाफकिन इन्स्टिट्यूट ही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अंतर्गत काम करते.

- यदु जोशी मुंबई : कोरोनाच्या उपचारात अत्यंत आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरच्या खरेदीचा घोळ संपता संपत नसून गेल्या एक महिन्यात शासनाच्या अखत्यारीतील हाफकिन इन्स्टिट्यूटला एकही व्हेंटिलेटर खरेदी करून इस्पितळांना पुरवता आलेले नाही.

हाफकिन इन्स्टिट्यूट ही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अंतर्गत काम करते. त्यांनी एक हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठीची निविदा २० मार्च रोजी काढली होती. मात्र काल मुदत संपतेवेळी केवळ एका कंपनीने निविदा भरली. त्या व्यतिरिक्त एकही कंपनी पुरवठा करण्यासाठी समोर आलेली नाही. निविदेतील जाचक अटींमुळे अन्य कंपन्या समोर आल्या नाहीत, असे म्हटले जाते. शिवाय एक हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्याची निविदा काढण्याऐवजी जर ती विभागून काढली असती तर काही कंपन्या निश्चितच समोर आल्या असत्या तसेच अमेरिकन एफडीए मालकांची अट असायला नको होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ज्या कंपनीने ही निविदा भरली आहे ती जर्मनीमधून व्हेंटिलेटरची खरेदी करणार आहे तेथून ते येण्यास किमान अडीच महिने लागतील अशी शक्यता आहे.पुरवठादाराने बारा आठवड्याच्या आत व्हेंटिलेटरचा पुरवठा करावा, अशी अट निविदेत होती. मात्र त्याच वेळी हाफकिनचे अधिकारी त्या एकमेव कंपनीवर दोन आठवड्याच्या आत आम्हाला व्हेंटिलेटरचा पुरवठा करा, असा दबाव आणत आहेत. तथापि कंपनीने अद्याप तशी कोणतीही हमी लेखी वा तोंडी स्वरूपात हाफकिनला दिलेली नाही. उलटपक्षी इतक्या कमी कालावधीत व्हेंटिलेटर पुरवायचे आहेत हे आधी माहिती असते तर आम्ही निविदा भरली नसती, अशी भूमिका आता एकमेव पुरवठादार कंपनीने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

फेब्रुवारीमध्ये एका अन्य निविदेअंतर्गत १५० व्हेंटिलेटर पुरवण्याचे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्यात आले होते. त्यांना पुरवठ्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला. नव्या निविदेत मात्र दोन आठवड्यातच पुरवठा करा, असा दबाव हाफकिनचे काही अधिकारी आणत आहेत.

कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. नव्या निविदेत जी कंपनी समोर आली आहे तिने आठ-पंधरा दिवसात पुरवठा करावा असा आमचा आग्रह आहे. कोरोनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने आम्हाला व्हेंटिलेटर खरेदीसाठी विनंती १६ मार्चच्या सुमारास केली. लगेच २० तारखेला आम्ही निविदा काढली. त्यामुळे निविदेला विलंब लागला हे खरे नाही.- आर. एन. कुंभार, व्यवस्थापक, हाफकिन

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार