Join us

धर्मादाय नियमांचे उल्लंघन केलेले नाही, नानावटी रुग्णालय, कोट्यवधी चॅरिटीवर खर्च  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 4:01 AM

निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी उच्च न्यायालयाचा आदेश व धर्मादाय नियमांचे कोणतेही उल्लंघन आम्ही केलेले नसून गतवर्षी ४ कोटी २८ लाख रुपये चॅरिटीवर खर्च केले आहेत, असा खुलासा डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी केला आहे.

मुंबई : निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी उच्च न्यायालयाचा आदेश व धर्मादाय नियमांचे कोणतेही उल्लंघन आम्ही केलेले नसून गतवर्षी ४ कोटी २८ लाख रुपये चॅरिटीवर खर्च केले आहेत, असा खुलासा डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी केला आहे.राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी १२ सप्टेंबर रोजी नानावटी रुग्णालयात केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’ संदर्भात डॉ. पाटणकर यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे की, १२ सप्टेंबर रोजी ११.२७ वाजता रुग्णालयात आलेल्या एका व्यक्तीने छातीत दुखत असल्याचा दावा केला. स्वागतकक्षातील कर्मचाºयांनी त्यांना तातडीने ओपीडीमध्ये जाण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर संबंधित व्यक्तीने आरोग्य समाजसेवकास भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांना रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सोशल वर्करच्या कार्यालयात नेण्यात आले. आपण गरीब असल्याचा दावा त्यांनी केला, पण उत्पन्नासंबंधीचा कोणताही दाखला अथवा रेशनकार्ड त्यांच्याकडे नव्हते. तरीदेखील आरोग्यसेवकांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची तयारी दर्शवून तीन-चार दिवसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली तरी चालतील, असे सांगितले. मात्र, तेवढ्यात त्यांनी आपण धर्मादाय आयुक्त असल्याचे सांगून ते निघून गेले.गेली साठ वर्षे नानावटी रुग्णालये आरोग्यसेवेत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गरीब रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात येतात. ५० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या रुग्णांवर मोफत तर एक लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या रुग्णांवर पन्नास टक्के सवलतीत उपचार केले जातात. त्याची माहिती वेळोवेळी धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात सादर केली जाते. रुग्णांच्या माहितीसाठी ठळक अक्षरात आणि दर्शनी भागात माहिती फलक लावण्यात आलेले असून रुग्णालयाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, डॉ. पाटणकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :हॉस्पिटलसरकार