मुंबई :
राज्यातील सर्वच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांमध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅन करून घेण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. महिनाभर वाट पाहूनही नंबर लागत नाही. यावर आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत अतिरिक्त सिटी स्कॅन आणि एम आर आय मशिन्स लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात शासकीय, वैद्यकीय महाविद्यालये व अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार विभागाच्या अंतर्गत शासकीय संस्थांमध्ये अद्ययावत रेडिओलॉजी व पॅथालॉजी केंद्रे सुरू करण्यासंदर्भातील बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करून तत्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करून देण्याच्या महाजन यांनी सूचना दिल्या. त्यामुळे या रुग्णालयात आता अतिरिक्त मशिन्स प्राप्त होणार असून प्रतीक्षा यादी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्याच्या घडीला बहुतांश मोठ्या आजाराच्या निदानासाठी एमआरआय किंवा सीटी स्कॅनच्या चाचण्या केल्या जातात. मात्र शासकीय रुग्णालयात ही चाचणी करण्यासाठी खूप मोठ्या प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा रुग्ण दुसरा पर्याय नसल्याने खासगी ठिकाणी जाऊन ही चाचणी करून घेतो. मात्र त्यासाठी त्याला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. कारण सरकारी शुल्काच्या दुप्पट तिप्पट खर्च खासगी ठिकाणी येतो. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होते.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या असल्याने त्याकरिता प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे या रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करून तत्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करून देण्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजी सेवा पुरविण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, ‘आयुष’चे संचालक डॉ. रमण घुंगराळकर, अवर सचिव सुनीलकुमार धोंडे तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.