युद्ध नको; शांती हवी, वीरमातेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 04:25 AM2018-08-15T04:25:01+5:302018-08-15T04:25:31+5:30
कारगिल युद्धादरम्यान काश्मीर येथील पुँछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात जवान नीलेश रमाकांत सावंत शहीद झाले. मुंबईतल्या जोगेश्वरी येथे नीलेश वास्तव्यास होते.
- सचिन लुंगसे
मुंबई - कारगिल युद्धादरम्यान काश्मीर येथील पुँछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात जवान नीलेश रमाकांत सावंत शहीद झाले. मुंबईतल्या जोगेश्वरी येथे नीलेश वास्तव्यास होते. आज या घटनेला कित्येक वर्षे लोटली असतानाच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने सावंत यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. नीलेश यांच्या आई मंदा रमाकांत सावंत यांनी नीलेशचा अभिमान असल्याचे सांगत, ‘आता युद्ध नको तर शांती हवी!’ असे नमूद केले. केवळ भारत-पाकिस्तान नव्हे, तर जगात कुठेही युद्ध नको. तसेच दहशतवादालाही थारा देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. आपले सैनिक सीमेवर लढत असताना त्यांना वीरमरण येते; ते आपल्या देशासाठी लढतात. आपल्याला त्यांचा अभिमान असलाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
६ डिसेंबर १९७३ रोजी जोगेश्वरीमध्ये नीलेश रमाकांत सावंत यांचा जन्म झाला. नीलेश यांनी आपले शालेय शिक्षण जोगेश्वरी येथील अरविंद हायस्कूलमधून पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण गोरेगाव येथील पाटकर महाविद्यालयात घेतले. याच काळात नीलेश यांनी राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर म्हणून ख्याती मिळविली. १९९३ साली बेळगाव येथील मराठा बटालियनमध्ये ते रुजू झाले. आर्मीत भरती व्हायचे, असे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. उत्तम बॉक्सर असल्याने ते आर्मीत भरती झाले. कारगिलचे युद्ध संपले असतानाच पुँछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. पुँछ सेक्टरमध्ये १३ हजार फुटांवरून ते शत्रूशी झुंज देत होते. या युद्धात ३ जून २००० रोजी नीलेश यांना वीरगती प्राप्त झाली.
नीलेश यांच्या नावाचे स्मारक : जोगेश्वरीत शहीद नीलेश सावंत यांचे स्मारकही उभारण्यात आले होते. अनुराधा गोरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती नीलेश सावंत यांची पुतणी अनघा सावंत हिने दिली. सरकारने शहीद नीलेश यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्यांच्या पत्नी संस्कृती यांना नोकरी देण्यात आली. सध्या त्या अंधेरी येथील तहसील कार्यालयात कार्यरत असून, दहिसर येथे मुलगा अजिंक्य याच्या सोबत वास्तव्यास आहेत.
नातेवाईकही लष्करात
नीलेश यांच्या आईचे अनेक नातेवाईक पोलीस आणि लष्करात कार्यरत होते. त्यांच्या घरी तसे वातावरण होते. ‘माझ्या काकांना आर्मीत भरती होण्याची इच्छा होती. माझ्या आजी-आजोबांनी यात त्यांना कधी अडथळा आणला नाही. काकांनीही पुँछ येथील मिशन मागून घेतले होते,’ अशा आठवणी मंदा सावंत यांनी जागवल्या.
कुटुंबीयांना घेता आले नाही अंत्यदर्शन
नीलेश यांना वीरगती प्राप्त झाली; याची माहिती नीलेश यांच्या कुटुंबीयांना ९ जून रोजी देण्यात आली. ही घटना घडली तेव्हा नीलेश यांचा मुलगा चार वर्षांचा होता. ते शहीद झाल्यानंतर त्यांचे पार्थिव घरी पाठविण्यात आले नाही; कारण ही घटना जेथे घडली तेथे पायवाटा खूप लहान असतात; शिवाय हा भाग १३ हजार फूट उंचीवर आहे.
अशा वेळी पार्थिव तेथून खाली उतरविणे किंवा हेलिकॉप्टर तेथे घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे शहीद नीलेश यांच्या पार्थिवावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्यांचे अस्थिकलश त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले होते. अस्थिकलश देण्यासाठी लष्कराचे अधिकारी आणि सैनिक जोगेश्वरीत दाखल झाले होते. एखाद्या शहीद सैनिकाला जशी मानवंदना देण्यात येते; तशा प्रकारे येथे मानवंदना देण्यात आली होती.