Join us

इंधनाविना पाणीउपसा यंत्र; आदिवासींना मुबलक पाणी

By admin | Published: April 11, 2015 10:37 PM

अविरत धडपडणाऱ्या तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील आदिवासी अवलिया कारागीर कमलाकर उराडे याला पाच वर्षांनी यश प्राप्त झाले आहे.

अनिरूद्ध पाटील ल्ल बोर्डीआदिवासी गावाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून वीज अथवा इंधनाविना नदीतून पाणी उपसणारे यंत्र बनविण्याकरीता अविरत धडपडणाऱ्या तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील आदिवासी अवलिया कारागीर कमलाकर उराडे याला पाच वर्षांनी यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे डोंगर उतारावरील जमीन हिरवीगार बनून आदिवासी कुटूंब स्वबळावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन रोजगाराकरीता होणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबू शकते.पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील गिरगाव, भूजाडपाडा या दुर्गम ठिकाणी कमलाकर सुखाड उराडे हा वडीलांचे छत्र हरपलेला तीस वर्षीय आदिवासी युवक आई आणि दोन छोट्या भावंडांसह राहतो. कुर्झे धरणातुन उगम पावणारी वरोळी ही बारमाही नदी गावाजवळून वाहते. मात्र गावातील मोजक्या तीन ते चार कुपनलिकेला मुबलक पाणी आहे. कमी दाब, लपंडाव आणि तांत्रिक बिघाडामुळे वीज असून नसल्यासारखी आहे. डोंगर उतारावर खडकाळ, कमी सुपीक व फक्त पावसाच्या पाण्यावर शेती होते. तर रोजगाराकरीता आदिवासी कुटूंबाना वीटभट्टी व शेत बांधकाम मजुर, मासेमार खलाशी अशा कामांसाठी वर्षातील आठ महिने स्थलांतर करावे लागते.आदिवासींचे खडतर जीवन पाहून कला शाखेची पदवी घेतलेले अन् समाजसेवेने झपाटलेला बेरोजगार आदिवासी युवक कमलाकर सुखाड उराडे अस्वस्थ होता. वडलोपार्जित शेती व गावालगत वाहणारी नदी हे चित्र मन अस्वस्थ करायचे. प्राथमिक शिक्षण घेत असताना पंकज किसन पाटील या शिक्षकाने दिलेली पाणचक्की, विद्युत जनित्र याची माहिती त्याला आठवली. त्या दिवसापासून तो झपाटल्यागत कामाला लागला. आज पाच वर्षाच्या अविरत प्रयत्नाने पाण्याच्या प्रवाहावर लाकूड, लोखंड व दोरीच्या सहाय्याने पाणी उपसणारे यंत्र बनविण्यात त्याला यश आले. आज नदीपात्रातील पाण अर्ध्या किमीवर चाळीस फुट उंच डोंगरातील शेतीत चोवीस तास उपलब्ध असून भाजीपाला लागवड केली आहे. या कामी गावातील वडिलधाऱ्यांनी अविश्वास दाखवला. पाच वर्षाच्या दिर्घ काळात तळहातावर पोट असणाऱ्या मित्रमंडळींनी याकामी त्याला पंचवीस हजाराची मदत केली. तर परिसरातील शाळकरी मंडळीने कामात सहकार्य केले. मिळालेल्या या यशाने हुरूप येऊन पुढील वर्षी गावातील ६५ आदिवासी घरांना घरगुती व शेती वापराकरीता विनामुल्य पाणीपुरवठा करणार असून रोजगार व स्थलांतराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा विश्वास कमलाकरने व्यक्त केला आहे. सायकलच्या चार रिंगांचे चक्र बनवून लाकूड, फळ्या व रबरी पुठ्यांचा वापराद्वारे झडपा बनविल्या. त्या एक फुट पाण्याच्या प्रवाहात सोडल्या. जनित्राप्रमाणे हे चक्र प्रवाहासह अविरत फिरते. हातपंपाप्रमाणे लाकडी दांडा बसवून दोरीने खटक्याला जोडला. बोअरवेलचा फुटवाल पाण्यात उतरवून सायकलला हवा भरणाऱ्या पंपाप्रमाणे पद्धती अवलंबली. त्यामुळे खटक्याच्या गतीने पंपात हवेचा दाब सोडला जावून उलट क्रियेत पाणी खेचले जावून बाहेर फेकले जाते. प्लास्टिक पाईपद्वारे शेतीपर्यंत जाते.तलासरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी गावात नळ किंवा कालव्याची योजना नाही. प्रयोग यशस्वी झाल्याने प्रतिदिन चार हजार लिटर पाणी उपसा होतो. पुढील वर्षी घरगुती व शेतीकरीता मुबलक पाणी देणारे यंत्र बनविणार - कमलाकर उराडे