व्हिलचेयर मिळाली नाही, ८० वर्षांचे आजोबा काही पावलं चालले आणि खाली कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:47 AM2024-02-16T11:47:53+5:302024-02-16T14:38:33+5:30

मृत ज्येष्ठ नागरिक हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे पासपोर्टधारक होते.

No wheelchair available, 80-year-old grandfather walks a few steps and collapses, shocking incident | व्हिलचेयर मिळाली नाही, ८० वर्षांचे आजोबा काही पावलं चालले आणि खाली कोसळले

व्हिलचेयर मिळाली नाही, ८० वर्षांचे आजोबा काही पावलं चालले आणि खाली कोसळले

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ८० वर्षीय व्यक्ती व्हिलचेअर न मिळाल्याने जागेवर कोसळली. जखमी झालेल्या या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीने त्यांच्या पत्नीसोबत न्यूयॉर्क येथून एअर इंडियाच्या विमानात व्हिलचेअर पॅसेंजरच्या रूपात बुकिंग केली होती. 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार व्हिलचेअरचा तुटवडा असल्याने या जोडप्यासाठी केवळ व्हिलचेअर असिस्टंट तिथे आला. पत्नी त्या व्हिलचेअरवर बसली. तर हे ८० वर्षीय गृहस्थ त्यांच्यामागून चालू लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इमिग्रेशन एरियापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सुमारे १.५ किमी पायी चालले असतील. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यांना मुंबईविमानतळावरील वैद्यकीय कक्षात घेऊन गेले. तिथून त्यांना नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. 

मृत ज्येष्ठ नागरिक हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे पासपोर्टधारक होते. त्यांनी व्हिलचेयरची सुविधा आधीपासून बुक करून ठेवली होती. या जोडप्याने मुंबईत जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-११६च्या इकॉनॉमी क्लासमधील तिकीट बुक केले होते. हे विमान रविवारी न्यूयॉर्कमधून रवाना झाले होते. विमानतळावरील एका सुत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या विमानामध्ये ३२ व्हिलचेयर प्रवासी होते. मात्र विमानतळावर केवळ १५ व्हिलचेयर उपलब्ध होत्या. 

दरम्यान, एअर इंडियाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, व्हिलचेयरच्या अधिक मागणीमुळे आम्ही प्रवाशांना व्हिलचेयर असिस्टंट मिळेपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी पत्नीसोबत चालण्याचा पर्याय निवडला होता. घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. तसेच त्यांना आवश्यकती मदत पुरवू, असे सांगितले. एका ग्राउंड स्टाफने सांगितले की, आम्ही नेहमी पाहतो की, ज्येष्ठ नागरिक जोडपी विमानतळावर विमानापासून एअरपोर्ट टर्मिनलपर्यंत एकट्याने प्रवास करण्यास असुरक्षित समजतात. ज्यांना चालण्या फिरण्यामध्ये त्रास होतो. ऐकण्यात अडचणी येतात, असे पती-पत्नी एकमेकांसोबत राहणं पसंत करतात.  

Web Title: No wheelchair available, 80-year-old grandfather walks a few steps and collapses, shocking incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.