मुंबई- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. तब्बल दीड तास पवार कुटुंबीयाची चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवारांनी बाहेर येताच माझी भूमिका धनंजय मुंडे स्पष्ट करतील, असे सांगूत ते निघून गेले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवारांनी राजीनामा का दिला हे त्यांच्याच तोंडून ऐका, असं म्हटलं आहे. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. सहकाऱ्यांशी बोलून ते अंतिम निर्णय घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
आमच्या कुटुंबात आईपासून एक पद्धत आहे. सर्व कुटुंबीय मिळून चर्चा करतात. ती चर्चा फक्त राजकीय होती असे नाही, काही कौटुंबिक चर्चा होत असतात. आता त्यांची बैठक आहे. त्यांची बैठक संपल्यानंतर धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ते भेटतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील, असंही शरद पवार म्हणाले आहेत.