मुंबई : भाडेकरू नोंदणीच्या नावाखाली अनेकदा मध्यस्थी किंवा दलालांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी मुंबईत वाढत आहेत. हीच बाब लक्षात घेत विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी आता भाडेकरू ठेवताना पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार, पोलिसांच्या संकेतस्थळावर भाडेकरू नोंदणीसंदर्भात बदल करण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांनी अशा जाळ्यात अडकू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर, जागा भाड्याने देण्याकरिता पोलिसांच्या कोणत्याही ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. नागरिक घर, जागा भाड्याने देण्याची माहिती मुंबई पोलिसांना ऑनलाइन अर्ज, प्रत्यक्ष संबंधित पोलिस ठाण्यास अर्ज किंवा पोस्टाद्वारे अर्ज पाठवून करू शकतात.
मुंबई पोलिसांच्या हद्दीमधील घर, जागा भाड्याने देण्याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्याकरिता नागरिकांना ही ऑनलाइन सेवा देण्यात आली आहे. ओटीपी हा घरमालकाच्या संपर्क क्रमांकावर पाठविला जाईल. घरमालकाचा पत्ता व भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तेचा पत्ता हा एकच देऊ नये. येथे पुरविलेली माहिती सत्य असल्याबाबत जागा, घरमालक आणि भाडेकरूने खात्री करावी.
...तर कारवाई
पोलिसांना खोटी माहिती पुरविणे गुन्हा असून, त्यानुसार, अर्जामधील माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित अर्जदारावर तसेच घरमालकावर कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिस प्रवक्ते प्रशांत कदम यांनी नमूद केले आहे.