Join us

टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 6:20 AM

दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ‘टाटा ट्रस्ट्स’कडे सामूहिकरीत्या टाटा सन्सची मालकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. रतन यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

शुक्रवारी टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळाची एक बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदासाठी ६७ वर्षीय नोएल टाटा यांच्या नावाला पसंती देण्यात आली. ‘टाटा ट्रस्ट्स’कडे सामूहिकरीत्या टाटा सन्सची मालकी आहे. ‘टाटा सन्स’ ही टाटा समूहातील सर्व कंपन्यांची मालक कंपनी आहे. या ट्रस्टच्या आधिपत्याखाली सर्व कंपन्या येतात. नोएल यांच्या नावाची अधिकृत घोषणा ट्रस्ट्सकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टाटा ट्रस्ट्स नेमके आहे तरी काय?

‘टाटा ट्रस्ट्स’ हा अनेक ट्रस्ट्सचा एक शिखर समूह आहे. त्यात सर रतन टाटा ट्रस्ट व इतर संबंधित ट्रस्ट्स आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि इतर संबंधित ट्रस्ट्स यांचा समावेश आहे. टाटा सन्समधील ६६ टक्के हिस्सेदारी या ट्रस्ट्सच्या मालकीची आहे. सध्या नोएल टाटा हे सर रतन टाटा ट्रस्ट चे एक विश्वस्त आहेत.

 

टॅग्स :टाटानोएल टाटारतन टाटा