मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यभरात पोलीस नियंत्रण कक्षातील खणखणही वाढत आहे. गेल्या ३१ दिवसांत ७४ हजार ११५ कॉलची नोंद झाली आहे. यात मुंबईतील सर्वाधिक १९ हजार ७१५ कॉलचा समावेश आहे.
राज्यभरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. यात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६० हजार ५ गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर ४१ हजार ७६८ वाहने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाई बरोबरच पोलिसांच्या १०० क्रमांकाच्या नियंत्रण कक्षात दिवसाला अडीच हजाराच्या आसपास तक्रारीचे कॉल येत आहे. त्यात कोरोना संशयित, सार्वजनिक ठिकाणी गर्दी, वाहतूक परवानगी, अशा स्वरूपाच्या माहितीच्या कॉल्सचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ७४ हजार ११५ कॉलची नोंद झाली आहे. यात एकटया मुंबईत तब्बल १९ हजार ७१५, त्याखालोखाल नागपूर (१८९२२), पुणे शहर ( ६८९५) कॉलचा समावेश आहे. तर बुलढाणा आणि अमरावतीमध्ये एकही कॉलची नोंद झालेली नाही. या तक्रारींचे निवारण पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासाठी विशेष पथक लक्ष ठेवून आहेत.