Join us

आवाज खाली! अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ध्वनी प्रदूषणावर करता येईल मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 10:37 AM

ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढयाचा एक भाग म्हणून विविध स्तरावर प्रयत्न केले जात असून, प्रार्थनास्थळी होत असलेल्या ‘आवाजा’ बाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आणि हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आवाज फाऊंडेशनचे काम सुरू झाले आहे.

मुंबईमुंबई शहर आणि उपनगरातील ध्वनी प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. हे वाढते ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आवाज फाऊंडेशनने टेल दी ड्रायव्हर नावाची मोहीम केव्हाचीच सुरू केली आहे. या मोहीमे अंतर्गत मुंबई आणि ठाणे येथील प्रदूषण कमी करण्यासाठी काम करण्यात आले आहे. यासाठी पोलीसांचीदेखील मदत घेण्यात आली आहे. आता ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढयाचा एक भाग म्हणून विविध स्तरावर प्रयत्न केले जात असून, प्रार्थनास्थळी होत असलेल्या ‘आवाजा’ बाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आणि हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आवाज फाऊंडेशनचे काम सुरू झाले आहे.

आवाज फाऊंडेशन दोन दशकांपासून पर्यावरणीय कारणांवर काम करत आहे. फाऊंडेशनने आवाजाचे धोरण आणि आवाज नियम अंमलबजावणीबाबत देखील काम केले आहे. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने, गणपती, दिवाळी आणि ईद ई मिलाद या सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषणाची पातळी बर्‍याच वर्षांत कमी झाली आहे, असा दावा करण्यात आला असून, दुसरीकडे लॉकडाऊच्या काळात प्रार्थना स्थळाकडून लाऊडस्पीकर वापरल्याच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. अशीच एक तक्रार सांताक्रूझ येथून लाऊड स्पीकरसंदर्भात आली आहे, अशी माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली. विशेषतः म्हणजे ध्वनी प्रदूषणाबाबत काम करताना कोणताही एका जात, धर्म, पंथ डोळ्यासमोर ठेवला जात नाही. आणि तो ठेवू देखील नये, असे आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलाली यांनी सांगितले.

ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. याबाबतचे पर्याय आम्ही सुचवू पाहत आहोत. मुळात ध्वनी प्रदूषणाने कोणाचेही आरोग्य बिघडता कामा नये, असे आमचे म्हणणे आहे. ध्वनी प्रदूषण कुठलेही असो. कोणत्याही स्तरावरचे असो. सगळ्यांना नियम सारखे आहेत. आणि त्या नियमांचे पालन झाले पाहिजे. टेल दी ड्रायव्हर या मोहीमेमुळे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास यश येत असून, नागरिकांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मदत केली तर नक्कीच ध्वनी प्रदूषणावर मात करता येईल, असा दावा फाऊंडेशनने केला आहे.

टॅग्स :प्रदूषणमुंबईपर्यावरण