मुंबई : सांताक्रुझ येथे उभारलेल्या नवीन इमारतीतील घरांच्या वाटपात वरिष्ठांना डावलून कनिष्ठांची वर्णी लागल्याने ‘ई - आवास’ प्रणालीद्वारे मोडकीतोडकीच घरे हाती लागणार असल्याचा सूर पोलीस दल आहे.मुंबईतील वरळी, नायगाव, माहिम, घाटकोपर, विक्रोळी, अंधेरी, बोरीवली अशा भागात पोलीस वसाहती आहे. मात्र यातील घरांची दुरवस्था झाली आहे. तर काही घरांमध्ये घडलेल्या घटनांमुळे पोलीस तेथे राहण्यास नकार देतात. यातच निवासस्थानाबाबत पारदर्शकता यावी म्हणून ‘ई- आवास’ प्रणालीचा रविवारी शुभारंभ झाला. त्यापूर्वीच सांताक्रुझ येथील नव्या इमारतीतील एकूण ४७ घरांचे वाटप आधीच झाले आहे. त्यात वरिष्ठांना डावलल्याचा आरोप एका पोलीस निरीक्षकाने केला. याविरोधात मुख्यमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांकडे त्यांनी तक्रार केली. याबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे निरीक्षकाने सांगितले.पोलीस निरीक्षकाच्या म्हणण्यानुसार, नवीन इमारतीतील घरांचे वाटप झाल्यामुळे आम्हाला जुन्याच इमारतींमधील रिक्त घरे प्रणालीत उपलब्ध असणार आहेत. याबाबत माहिती अधिकारात मुंबई पोलिसांनी प्रतीक्षा यादीत ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे ही प्रतीक्षा कधी संपेल याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष लागले आहे. आधी सांताक्रुझ येथील घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘ई - आवास’ प्रणालीतील घरांबाबत नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 6:02 AM