बीडीडी चाळवासीयांना नाममात्र मुद्रांक शुल्क, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:39 AM2021-08-19T05:39:34+5:302021-08-19T05:40:01+5:30
state cabinet meeting : या चाळींचा पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम ठरण्याच्या दृष्टीने, वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग व शिवडी येथील २०७ पात्र भाडेकरूंना मालकी हक्काने घरे देऊन करारनामे /दस्तावरील मुद्रांक शुल्क बैठकीत निश्चित करण्यात आले.
मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना (सदनिकाधारकांना) देण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचे करारनामे, दस्तावर आकारावयाचे मुद्रांक शुल्क प्रति सदनिका नाममात्र एक हजार रुपये याप्रमाणे आकारण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत मूळ रहिवाशांना ५०० चौ. फुटांची सदनिका मालकी तत्त्वावर विनामूल्य वितरित करण्यात येणार आहे. या चाळींचा पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम ठरण्याच्या दृष्टीने, वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग व शिवडी येथील २०७ पात्र भाडेकरूंना मालकी हक्काने घरे देऊन करारनामे /दस्तावरील मुद्रांक शुल्क बैठकीत निश्चित करण्यात आले.
कार्यक्रमांना गर्दी धोकादायक : मुख्यमंत्री
राज्याचे अर्थचक्र गतिमान राहावे यासाठी कोरोना निर्बंधांमधून शिथिलता देण्यात आली असली तरी राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम नियमांचा भंग करून आयोजित केले जात असून आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या, नियम हे पाळलेच गेले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.