मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे. भाजप उमेदवाराबाबतची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता नाही. अगदी शेवटच्या क्षणी म्हणजेच ८ किंवा ९ एप्रिलला येथील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात अर्जासाठी फक्त तीन दिवस आहेत. त्यात ६ तारखेला गुढीपाडवा आणि ७ तारखेला रविवारच्या सुट्टीमुळे उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत. त्यानंतर, पुढील आठवड्यात ८ आणि ९ एप्रिल हे दोनच दिवस आहेत. त्यामुळे उत्तर मुंबईतील भाजपच्या उमेदवाराबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपकडून विविध नावांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात केल्याने संभ्रम वाढला आहे. शिवसेनेच्या दबावामुळे उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे का, असे विचारले असता, काही शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्या नावाला विरोध आहे. शिवसेनेचा येथील उमेदवारीबाबत कसलाच आक्षेप नाही. काँग्रेस आघाडीकडे उमेदवारच नसल्याने अनेक ठिकाणी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत नाही. भाजपकडे अशी स्थिती नाही. आमच्याकडे उमेदवार आहे. त्यामुळे योग्य वेळी उत्तर पूर्वबाबत घोषणा होईल, असे तावडे म्हणाले.