मुंबई : भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयात हजर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट शुक्रवारी रद्द केले.
भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्याने न्या. राहुल रोकडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र, शुक्रवारी भुजबळ न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयाने वॉरंट रद्द केले.
२०१५ मध्ये एका जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र सदन बांधकामाच्या कंत्राटात अनियमितता, कलिना येथील जमिनीचा व्यवहार आणि तिथे वाचनालय उभारण्याच्या कंत्राटातील अनियमिततेप्रकरणी भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांतून आरोप मुक्त करण्याच्या भुजबळ व अन्य आरोपींच्या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे.