Join us

Navneet Rana : खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 9:27 AM

२२ ऑगस्ट रोजी न्यायालयाने राणा व त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट  जारी केले.

मुंबई : राखीव जागेवरून निवडून येण्यासाठी फसवणूक करून जात प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 

राणा यांनी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात फेरफार करत अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. जात प्रमाणपत्रामुळेच राणा यांना अमरावती येथील राखीव मतदारसंघातून  निवडणूक लढवू शकल्या व त्या जागेवरून निवडूनही आल्या. या प्रकरणी पोलिसांनी राणा व त्यांचे वडील हरभजनसिंह कुंडले यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी न्यायालयाने राणा व त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट  जारी केले. त्यानंतर तीन दिवसांत ते दोघेही न्यायालयात हजर राहिले. 

न्यायालयाने त्यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द करत प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारला. गेल्या वर्षी जूनमध्ये उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आणि बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. शुक्रवारी राणा यांच्या वकिलांनी सुनावणी तहकूब करण्याची विनंती दंडाधिकाऱ्यांना करताच त्यांनी राणा व त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

टॅग्स :नवनीत कौर राणान्यायालयमुंबई