नालेसफाईच्या कामाला यंदा चार महिन्यांआधीच सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:19+5:302021-02-06T04:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने कोविड काळात रखडलेली अनेक कामे वेगाने सुरू करण्यात येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने कोविड काळात रखडलेली अनेक कामे वेगाने सुरू करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे, तर यावर्षी नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामही दोन महिन्यांआधीच सुरू करण्यात येणार आहे. मिठी नदीसह मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी तब्बल १३२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
नालेसफाईची ७० ते ८० टक्के कामं पावसाळ्याआधी केली जातात, तर उर्वरित काम पावसाळा आणि पावळ्यानंतर सुरू असते. मात्र, अनेकवेळा नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम संथगतीने सुरू राहते, तर नालेसफाईच्या कामात ठेकेदारांनी कुचराई केल्यास त्याचा परिणाम मुंबईकरांना पावसाळ्यात भोगावे लागतात. मात्र, यावर्षी पावसाळी कामे चार महिने आधीच सुरू करण्यात येणार आहेत.
यावेळेस पालिकेने गाळाच्या मेट्रिक टनाच्या हिशेबाने कामाची किंमत ठरविली आहे. ठेकेदारांनी काढलेला गाळ मुंबईबाहेर टाकावा लागणार आहे. या कामात फक्त शहर विभागातील एफ उत्तर, जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांसाठी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा तीन टक्के दराने कंत्राट देण्यात येणार आहे, तर इतर ठिकाणी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा १३ ते २९ टक्के कमी दराने कंत्राट देण्यात येणार आहे.
मिठी नदीसाठी ६२ कोटी
मिठी नदीच्या साफसफाईचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. यासाठी पालिका ६२ कोटी ४२ लाख रुपये खर्च करणार आहे. यामध्ये कुर्ला टिचर्स कॉलनी ते वांद्रे कुर्ला संकुलापर्यंतच्या नालेसफाईसाठी ३२ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, तर पवई फिल्टरपाडा ते टिचर्स कॉलनीपर्यंतच्या मिठी नदीच्या सफाईसाठी २९ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.