मुंबई : निवडणूक आयोगाला घटनात्मक अधिकार असून निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या, की ईव्हीएमवर हे आयोगानेच ठरवायचे आहे. घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगावर अशाप्रकारे जनमानसात संभ्रम निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आशिष शेलार य़ांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर टीका करत आंदोलन छेडले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषद घेऊन जे नेते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत त्यापैकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ईव्हीएम द्वारेच निवडून आले आहेत. त्यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच ईव्हीएम बाबत बोलावे, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
जेव्हा हे सगळे निवडून येतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडायचे. हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा आहे. जनतेने जो कौल दिला आहे त्याचाही हे अपमान करीत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या सल्याप्रमाणे या सर्वांनी आत्मचिंतन करायची गरज असल्याचे शेलार यांनी सांगितले.
राज ठाकरेंना टोला, आव्हानराज ठाकरे यांनी ईव्हीएमवर पत्रकार परिषदेत टीका केल्याने शेलार यांनी टोला लगावला आहे. जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी मगच ईव्हीएमबाबत बोलावे असे आव्हानच शेलार यांनी राज यांना दिला आहे.