Join us

वीज कामगारांचे असहकाराचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:05 AM

मुंबई : वीज कामगार, अभियंते, अधिकारी व आऊट-सोर्सिंग कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा व इतर मागण्यांसाठी वीज कामगार, ...

मुंबई : वीज कामगार, अभियंते, अधिकारी व आऊट-सोर्सिंग कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा व इतर मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते व अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने बुधवारीदेखील विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. बुधवारी या आंदोलनाचा चौथा दिवस होता. कर्मचारी, अभियंते, अधिकारी, आऊट-सोर्सिंग कामगार यांच्या भावना संघटना पदाधिकारी यांनी मांडल्या आहेत. अपेक्षित निर्णय न झाल्याने कृती समितीने असहकाराचे आंदोलन पुढे सुरूच ठेवले आहे.

कोविडसारख्या महामारीत ग्राहकांना अखंडित वीज सेवा देणाऱ्या कर्मचारी, अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी बाह्यस्रोत कामगार यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन ऊर्जा विभाग व तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनाने जिथे चुकीचे निर्णय घेतले तिथे कामगार हित लक्षात घेत विरोध करण्याची भूमिका संयुक्त कृती समितीने यापूर्वीही घेतली आहे. यावेळी देखील तशीच भूमिका संयुक्त कृती समितीची आहे. म्हणूनच बैठक होत असताना अनेक मुद्दे मांडले गेले. त्याविषयी योग्य निर्णय अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवले आहे, असे वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या?

वीज कामगार, अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा द्याव्यात. फ्रंटलाईन वर्कर समजून वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार, सर्व सहाय्यक, वीजसेवक व प्रशिक्षणार्थी यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.