Join us  

नॉन कोविड शस्त्रक्रिया हळूहळू होताहेत पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 8:25 AM

मागील कित्येक महिने उपचारांअभावी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा

मुंबई : शहर उपनगरात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता महापालिका रुग्णालयांमध्ये नॉन कोविड शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या आहेत. याखेरीज बाह्य रुग्ण विभागातही रुग्णांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे मागील कित्येक महिने उपचारांअभावी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले, नायर रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा ८० टक्के पूर्ववत झाली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये नायर रुग्णालयाने मोठे योगदान दिले आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयातील १ हजार १०० खाटा आणि ११० अतिदक्षता विभागातील खाटा आरक्षित करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आरक्षित असलेल्या खाटांची संख्या हळूहळू कमी करण्यात आली सुरुवातीलाच सातशे मग ५०० या पद्धतीने हे प्रमाण राखण्यात आले. सध्या रुग्णालयांत १०० खाटा कोरोना रुग्णांसाठी, तर चाळीस अतिदक्षता विभाग खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.केईएम रुग्णालयातही कोरोना पूर्वी दिवसाला छोट्या आणि मोठ्या ३०० ते ३२० शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. हे प्रमाण आता २०० वर आले आहे. याखेरीज केईएम रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दिवसाला पाच ते सात हजार रुग्णांची वर्दळ असायची; परंतु अजूनही रुग्ण संख्या पूर्ववत झाली नसून यात २० टक्के घट आहे. खासगी रुग्णालयातही सेवा पूर्ववतशहर उपनगरातील खासगी रुग्णालयांमध्ये ही बाह्यरुग्ण विभागातील सेवा ७० टक्के पूर्ववत झाल्या आहेत. बऱ्याचदा शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयात बाहेरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. परिणामी आता हे प्रमाण चाळीस टक्क्यांवर आले आहे. शस्त्रक्रियांचेही नियोजन केले जात आहे.