Join us

पर्यावरणासाठी धोकादायक वनेतर उपक्रमांना परवानगी नाही - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 4:27 AM

जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत वर्षा या निवासस्थानी गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत वर्षा या निवासस्थानी गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.पश्चिम घाट जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत व गावे वगळण्यासंदर्भातील आपली ही भूमिका केंद्र सरकारला स्पष्टपणे कळविण्यात येईल. पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रामधून गावे वगळण्यापूर्वी वनविभागाने आधी त्या गावांचा ड्रोन सर्व्हे करावा , तेथे कुठले वनेतर उपक्रम आहेत याची माहिती घ्यावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा. जी गावे वाघ किंवा इतर वन्यजीवांच्या भ्रमण मार्गामध्ये येतात, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम घाटातील ६२ गावांचा ड्रोन सर्व्हे करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आ. दीपक केसरकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरे