मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे शेकडो लोकांचे जीव गेले. याबद्दल या अविचारी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी भूमिका दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीकेची झोड उठवताना गायकवाड म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी अधिकाधिक छोटे उद्योग उभे राहणे गरजेचे आहे. मात्र मोदी सरकारच्या निर्णयांमुळे छोट्या उद्योगांवरच कुºहाड कोसळली. अनेकांचे रोजगार गेले. ही परिस्थिती सावरण्यासाठी लघुउद्योजकांना पुन्हा उभे करण्याची गरज आहे. याशिवाय जीएसटीची पुनर्आखणी करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील बीडीडी चाळीचे आयुष्य आता संपले असून बीडीडी पुनर्विकासाचा मुद्दा युद्धपातळीवर मार्गी लागण्याची गरज आहे. तसेच धारावीचा पुनर्विकास एसआरएअंतर्गत न करता धारावीच्या पुनर्विकासासाठी न्यू सिटी डेव्हलपमेंट प्लान राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच प्रत्येकाला किमान पाचशे चौरस फुटांचे घर मिळायला हवे या आश्वासनाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.मनसे आणि राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत विचारले असता, मनसे आणि राज ठाकरे हे त्यांची स्वत:ची भूमिका मांडतात. त्यांच्या सभा आणि भाषणे पाहिली तर हा सूर्य आणि हा जयद्रथ अशी त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांमुळे जनमानसावर नक्कीच प्रभाव पडत आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल गायकवाड यांनी त्यांचे आभारही मानले.
‘नोटाबंदीमुळे शेकडो लोकांचे नाहक जीव गेले’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 1:33 AM