अनिवासी भारतीयांना ‘रिअल इस्टेट’ची भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 07:23 AM2024-01-14T07:23:30+5:302024-01-14T07:23:50+5:30
नुकत्याच सरलेल्या २०२३च्या वर्षात अनिवासी भारतीयांनी भारतामध्ये घर व कार्यालयांच्या खरेदीत २०० कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
मुंबई : एकीकडे २०२३ या वर्षात भारतीयांनी घर व कार्यालयांची जोरदार खरेदी केली असतानाच आता दुसरीकडे या खरेदीत अनिवासी भारतीयांनीही मोठा हातभार लावल्याची माहिती पुढे आली आहे. नुकत्याच सरलेल्या २०२३च्या वर्षात अनिवासी भारतीयांनी भारतामध्ये घर व कार्यालयांच्या खरेदीत २०० कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २०२३ मध्ये भारतात राहणाऱ्या लोकांचा कल घरांच्या खरेदीकडे अधिक असला तरी अनिवासी भारतीयांनी मात्र व्यावसायिक कार्यालये, गोडावून आदींची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. दुबई, कॅनडा, लंडन येथील भारतीयांनी मुंबई, बंगळुरू, चेन्नई व दिल्ली येथील व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदीत जास्त रस घेतल्याचे दिसून येते. भारतीयांनी सरत्या वर्षात जी खरेदी केली, त्यामध्ये गृहविक्रीचे प्रमाण ७० टक्के होते तर व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदीचे प्रमाण ३० टक्के इतके होते. मात्र, अनिवासी भारतीयांनी ज्या व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्या त्यांचे प्रमाण तब्बल ८० टक्के इतके आहे तर उर्वरित २० टक्के लोकांनी घर खरेदीला प्राधान्य दिले आहे.
भारत व अन्य परदेशातील चलन मूल्यात असलेल्या फरकामुळे भारतीय मालमत्ता तुलनेने स्वस्त आहेत. तसेच, भारतामध्ये वाढणाऱ्या व्यावसायिक घडामोडी पाहता व्यावसायिक कार्यालयांना मागणी वाढत आहे. त्यांच्याद्वारे मिळणारे भाड्याचे उत्पन्न देखील दमदार असल्यामुळेच गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून अनिवासी भारतीयांनी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचे विश्लेषण केले जात आहे.