विनावाहक बससेवेचा वाहकांच्या डोक्याला ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:52 AM2020-02-14T01:52:01+5:302020-02-14T01:52:46+5:30

बेस्ट समितीमध्ये नाराजी व्यक्त : त्रुटी दूर करण्याचे प्रशासनाचे बैठकीत आश्वासन

Non-service bus service fever | विनावाहक बससेवेचा वाहकांच्या डोक्याला ताप

विनावाहक बससेवेचा वाहकांच्या डोक्याला ताप

Next

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने खर्च कमी करण्यासाठी विनावाहक बससेवा सुरू केली आहे. मात्र पॉइंट टू पॉइंट या बस सेवेसाठी वाहकाला बसथांब्यावर बराच काळ उभे राहावे लागत आहे. त्यामुळे ही सेवा बस वाहकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरू लागली आहे. याबाबतचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत गुरुवारी उमटले. त्यानुसार या सेवेतील त्रुटी दूर करण्यात येईल, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने सदस्यांना या वेळी दिले.


मुंबईत सध्या ८६ मार्गांवर ५४९ विनावाहक बससेवा सुरू आहे. या सेवेत मधल्या मार्गांवर बसगाड्यांना थांबा नसतो. तर एका मार्गावरून बस सुरू होण्याआधीच वाहक प्रवाशांना तिकीट देतो. या सेवेला पॉइंट टू पॉइंट सेवा म्हणून ओळखले जाते. या सेवेमध्ये बस सुरू झाल्यानंतर काही ठरावीक ठिकाणी थांब्यांवर बस थांबवताना तेथे उभ्या असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. त्यानंतर थेट शेवटच्या थांब्यावर बस थांबते. या सुपरफास्ट सेवेमुळे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी नियोजित वेळी पोहोचता येते.


मात्र ही बससेवा देताना बसगाड्यांचा मागील दरवाजा बंद करून त्या चालवल्या जात आहेत. बसगाड्यांना एकच दरवाजा असणे, वाहक नसणे हे योग्य नसून प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचा आरोप भाजपचे सुनील गणाचार्य यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत गुरुवारी केला. या सेवेमुळे विनातिकीट प्रवाशांचे फावले असल्याने बेस्टचे उत्पन्न बुडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यात अनेक त्रुटी असल्याने विनावाहक बससेवा बंद करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर स्पष्टीकरण देताना विनावाहक सेवेतील बसगाड्यांचे मागील दरवाजे बंद करूनच चालवत असल्याचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी स्पष्ट केले.


बेस्ट उपक्रमामार्फत सध्या ८६ बस मार्गांवर विनावाहक बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ४१ मार्गांवर बेस्टच्या स्वमालकीच्या २२४ बस विनावाहक म्हणून धावतात, तर ४५ मार्गांवर भाडेतत्त्वावरील ३२५ बस धावत आहेत.
विनावाहक बससेवेतील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील. या सेवा देताना प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिले.


विनावाहक सेवेमुळे वाहकांची तारांबळ उडत आहे. वाहक या बसगाड्यांसाठी एकाच ठिकाणी पाच ते सहा तास उभा राहतो. त्यामुळे प्रसाधनगृहातही जाता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे, असे सदस्यांनी निदर्शनास आणले.

विनावाहक बसगाड्यांमध्ये कमी प्रवासी असतात, तर काही गाड्यांमध्ये प्रवासीच नसतात. मात्र पॉइंट टू पॉइंट सेवा देताना मधल्या थांब्यांवरून त्यांना नियमानुसार प्रवासी घेता येत नाहीत. परिणामी त्या थांब्यांवरील प्रवासी ताटकळत राहत असल्याने यात बेस्टचे नुकसान होत असल्याचे शिवसेनेचे अनिल कोकीळ यांनी सांगितले.

Web Title: Non-service bus service fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.