ठाणे : एक वर्षावर आलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाणेकरांवर वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडून मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या सर्वांवर गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाने विरजण टाकले. त्यामुळेच यंदाच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता, जी कामे सद्य:स्थितीत सुरू आहेत, ती पूर्ण करण्यावर भर दिला आहे, तसेच भांडवली खर्चात ४९ टक्के कपात करून उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. यातूनच कोणतीही करवाढ अथवा दरवाढ नसलेला वास्तववादी असा २०२१-२२ चा दोन हजार ७५५.३२ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना सादर केला.
महापालिका आयुक्तांनी सादर केलेले २०२०-२१ चे मूळ अंदाजपत्रक चार हजार ८६ कोटींचे होते; परंतु कोरोना व त्याच्या नियंत्रणासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यात घट झाल्याने सुधारित अंदाजपत्रक दोन हजार ८०७ कोटींचे झाले. आता २०२१-२२ चे दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचे सादर केले आहे. यात उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. मालमत्ताकरापोटी ६९३.२४ कोटी, विकास व तत्सम शुल्कापोटी ३४२ कोटी, स्थानिक संस्था करापोटी ११५२.७० कोटी, पाणीपुरवठा आकारापोटी २०० कोटी, अग्निशमन दल ९८.२६ कोटी, स्थावर मालमत्ता २१.०५ कोटी, जाहिरात फी २२.३७ कोटी, अनुदानापोटी १०७.६७ कोटी, कर्जापोटी १६४.४९ कोटी असे धरून आरंभीची शिल्लक ३९२.७८ कोटींसह एकूण अंदाजपत्रक दोन हजार ८७ कोटी तीन लाख व २०२१-२२ मध्ये आरंभीची शिल्लक ५६ लाखांसह दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
भांडवली खर्चांतर्गत पाणी पुरवठा विभागासाठी ११४.२९ कोटी, मलनि:सारण ५०.५९ कोटी, पूल प्रकल्प ४८.१७ कोटी, रस्ते विकास २४०.२५ कोटी, रस्त्यांवरील दिवाबत्ती ३६.३३ कोटी, आरोग्यसुविधा २७.१० कोटी, घनकचरा व्यवस्थापन २९.२० कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. त्यानुसार ३५ लाख अखेरच्या शिलकीसह एक हजार ८९९ कोटी ६९ लाख महसुली आणि ९३५.३७ कोटी भांडवली खर्च असा एकूण दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प केला.
कोविडसाठीदेखील विशेष तरतूद
भांडवली खर्चासाठी दोन हजार १५४ कोटी दोन लाख प्रस्तावित होते; परंतु कोरोनामुळे त्याला कात्री लावून एक हजार ५७ कोटी ३६ लाखांवर आणले आहे, ही या अर्थसंकल्पाची जमेची बाजू म्हणावी लागणार आहे. कोविडसाठीदेखील यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे.