देशद्रोह प्रकरण; कंगना रनाैतचा उच्च न्यायालयात दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही किंवा कोणताही गुन्हा घडलेला नाही, असे दावा करत अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला सोमवारी केली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी ठेवत कंगना व तिची बहीण रंगोली यांना दिलेले अंतरिम संरक्षण तोपर्यंत कायम ठेवले.
कंगनाने ट्विटद्वारे काहीच चुकीचे केले नाही, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे दिलेले आदेश अयोग्य असल्याने त्यांचा आदेश व पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती सिद्दिकी यांनी न्यायालयाला केली.
गुन्हा नोंदविण्याचा आदेश देताना वांद्रे न्यायालयाने सारासार विचार केला नाही. जे कलम लावण्यात आले आहे, त्याअंतर्गत कोणताच गुन्हा केलेला नाही. माझ्या ट्विटरवर लोकांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्याचे हिंसाचारात रूपांतर झाले नाही. त्यामुळे मला कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही, असे सिद्दिकी यांनी कंगनाच्या वतीने न्यायालयाला सांगितले.
वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी कंगना व तिची बहीण रंगोली हिच्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघींना समन्स बजावले. या कार्यवाहीला दोघींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
व्यवसायाने वकील असलेल्या मुनावर अली सय्यद याने कंगना व रंगोलीने ट्विट करून दोन समाजांत द्वेष पसरवत असल्याची तक्रार वांद्रे न्यायालयात केली.
...................................