Join us

"४८ पैकी तुमचा एकही खासदार येणार नाही"; जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:11 AM

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई/बीड-  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. सगेसोयरेची व्याख्या लागू करावी यासाठी गेल्या सात महिन्यांपासून मराठा समाजासाठी लढा देत आहे. मात्र, माझ्या विरोधात आपल्याच जातीचे लोक उठले आहेत. जर तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, असा सवाल उपस्थित करून पक्षाला नाही तर जातीला बाप माना असा सल्ला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील नेत्यांना दिला. तर, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपालाच आव्हान दिलं आहे. तसेच, तुमचा सुफडा साफ होईल, एकही खासदार निवडून येणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले. 

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस यांनी माझ्या विरूद्ध पोलिस कारवाई सुरू केली आहे. इतरांना वेगळा न्याय व मला वेगळा न्याय दिला जात असल्याचे म्हणत जरांगे यांनी थेट निवडणुकांचं चॅलेंज दिलं आहे. तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे करायंच आहे ते तुम्ही करा, पण मला जे करायचंय ते मी करणार, तुम्ही काहीही व्हिडिओ आणा आणि कसल्याही रेकॉर्डींग आणा. पण, तुमच्या मुंडक्यावर पाय ठेऊनच मी आरक्षण घेणार, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. तुम्ही मला किती बदनाम केलं, पण समाजासाठी एक इंचही मी मागे हटणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील संवाद बैठक मेळाव्यातून ते बोलत होते. 

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, मला बदनाम करुन मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला, तर भाजपाच्या ४८ पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून येऊन द्यायचा नाही, असे आवाहनच मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला केले आहे. तुम्ही कसलेही व्हिडिओ व्हायरल करा, एडिट करा. पण, आता जीव गेला तरी मागे हटायचं नाही, मी राजकारणावर कधीच बोललेलो नाही. पण, यांनी मला तुमच्यापासून तोडायचा प्रयत्न केला आहे, मला संपवण्याचा विडा उचलला असला तर, मी आज जाहीरपणाने सांगतो. तुझं राज्यातलं एकही खासदारकीचं आणि विधानसभेचं सीट निवडून येणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला. तसेच, भले मी राज्य सोडून जाईन, देश सोडून जाईन, माझा जीव गेला तरी चालेल, पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले.

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलबीडदेवेंद्र फडणवीसभाजपालोकसभा