Join us

पुणे-मुंबई एसटीचा नॉनस्टॉप प्रवास

By admin | Published: July 11, 2015 10:27 PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बस निर्धारित केलेल्या हॉटेलमध्ये थांबत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. पुणे ते मुंबई या मार्गावर

खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बस निर्धारित केलेल्या हॉटेलमध्ये थांबत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. पुणे ते मुंबई या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस पुण्यातून निघाल्यानंतर थेट मुंबईतच थांबत असल्याने प्रवाशांना उपाशीपोटी प्रवास करावा लागतो. बस थांबत नसल्याने स्वच्छतागृहाअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: महिला प्रवाशांची चांगलीच कुचंबणा होते. पुण्यातून निघाल्यानंतर मुंबईकडे जाताना बसचालकांना बस निर्धारित ठिकाणी थांबविण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची निर्मिती झाल्यानंतर या मार्गावर प्रवाशांना खाण्या-पिण्याची सोय व्हावी म्हणून हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावरून राज्य परिवहन मंडळाच्या शिवनेरी, निमआराम व साध्या एसटी बसही धावतात. या बसमधील प्रवाशांना नाश्ता व जेवणासाठी परिवहन मंडळाने काही हॉटेल थांबे म्हणून निश्चित केले आहेत. मुंबईतून निघाल्यानंतर या बसेस खोपोलीजवळ असलेल्या फूडमॉल हॉटेलमध्ये थांबतात. तर पुण्यावरून निघाल्यानंतर बसना फूडहब हा थांबा देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यावरून येणाऱ्या बसेसफूडहब येथे न थांबता थेट मुंबईला जातात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते.बस या ठिकाणी थांबाव्यात यासाठी राज्य परिवहन विभाग नियंत्रकांबरोबर करार करण्यात आले आहेत. मात्र बसचालक या करारांचे पालनच करत नसल्याने प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाश्ता व जेवण यासाठी परिवहन विभागाने निर्धारित केलेल्या ठिकाणी बसचालकांना बस थांबवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. याबाबत विभाग नियंत्रकांना निवेदन देण्याची तयारी या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)एक्स्प्रेस-वेवरून धावणाऱ्या बसेसना निर्धारित थांबे दिले आहेत. प्रवाशांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र निर्धारित थांब्यांवर बस थांबत नसतील तर बसचालकांना सूचना करून बस थांबवाव्यात, अशी व्यवस्था केली जाईल.- संजय सुपेकर, वाहतूक नियंत्रक, कुर्ला.पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या बसना हॉटेल फूडहब हा थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी आम्ही परिवहन विभागाला लाखो रुपये अदा करतो. मात्र गेले काही दिवस एसटी बस लोणावळा येथे थांबत आहे. हा थांबा जुन्या राष्ट्रीय मार्गावरून धावणाऱ्या बससाठी आहे. मात्र एक्स्प्रेस-वेवरून धावणाऱ्या बसही सदर ठिकाणी थांबत असल्याने मोठे नुकसान होत आहे.- शौकत मरेडीया,संचालक, फूडहब, खोपोली.