Ujwal Nikam : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपने अखेर प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीत वर्षा गायकवाड यांचे किती आव्हान असणार आहे याबाबत उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.
उमेदवारी जाहीर होताच विलेपार्ले येथील कार्यालयात निकम यांचा भाजप प्रवेश पार पडला. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मुंबईतील प्रार्थना स्थळांना भेट आशीर्वाद घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड यांच्या विरोधात कोणत्या प्रकारची रणनिती आखली जाणार असं विचारलं असता निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
“मी न्यायालयात समोरच्या पक्षाला कधीही कमी लेखलं नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड या वरिष्ठ आणि धुरंदर राजकारणी आहेत. याची मला पूर्णपणे कल्पना आहे,” असे सूचक विधान उज्ज्वल निकम यांनी केलं आहे.
यावेळी भाजपने मुंबईत तीन विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. याबाबत बोलताना “मला यावर आज राजकीय भाष्य करता येणार नाही. उमेदवारी न मिळालेल्या खासदारांना पक्षनेतृत्वाच्या मनात त्यांच्यावर चांगली जबाबदारी देण्याची इच्छा असू शकते. प्रत्येक गोष्टीतून चुकीचा अर्थ काढू नये. न्यायालयात कायद्याची लढाई खेळत होतो. पण आता मी आणि माझ्या पक्ष चांगला का याची वकिली जनतेच्या दरबारात करणार आहे,” अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.
“देशाची प्रतिमा जगभरात उंचावली आहे याचं सगळं श्रेय पंतप्रधान मोदींचं आहे. मला जी जागा लढवण्यासाठी देण्यात आली आहे ती महत्त्वाची आहे. मनोहर जोशींनी ही जागा लढवली आहे. माझा हाच प्रयत्न असेल की देशात जे नवे कायदे येतील, ते लोकहिताचे कसे असतील हे पाहण्याचा माझा प्रयत्न असेल. आपल्या देशात विविध जाती-पंथाचे लोक राहतात. आपल्या लोकशाहीचं उदाहरण जगात दिलं जातं त्यामुळे मी अशाच गोष्टी करेन,” असेही निकम यांनी उमेदवारी जाहीर होताच म्हटलं होतं.
दरम्यान, विलेपार्ले, वांद्रे पूर्व आणि पश्चिम, चांदिवली, कलिना आणि कुर्ला हे विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचा तिढा गेल्या महिनापासून कायम होता. भाजपने पहिल्या यादीपासूनच विद्यमान खासदार पूनम महाजन यांना दूर ठेवलं होतं. त्यामुळे या मतदारसंघात नव्या उमेदवाराची चाचपणी सुरु असल्याचे निश्चित झालं होतं. या मदरासंघासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडेची विचारणा करण्यात आली होती. मात्र अखेर उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.