Join us

उत्तरेतील थंडीची लाट महाराष्ट्राच्या वेशीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 7:01 PM

Cold wave : सोमवारी मुंबईच्या किमान तापमानात घट होणार, महाराष्ट्रही गारठणार

मुंबई : उत्तर भारत कमालीचा गारठला असतानाच मुंबईसहमहाराष्ट्रात मात्र अद्यापही म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. परिणामी राज्यातील नागरिक थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेची स्वारी आता वा-याच्या वेगाने दक्षिणेकडे आगेकुच करत आहे. उत्तरेतील थंडीची लाटा आता महाराष्ट्राच्या वेशीवर म्हणजे मध्य प्रदेशात दाखल झाली असून, राज्यात त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. येत्या काही तासांत थंडीची लाट महाराष्ट्रात दाखल होणार असून, खाली घसरणा-या किमान तापमानामुळे मुंबईसह महाराष्ट्र गारठणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामान आता कोरडे नोंदविण्यात येत आहे. पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात येईल. येत्या ४८ तासांत राज्यातील हवामानात घट नोंदविण्यात येईल. किमान तापमानात मोठया प्रमाणावर घसरण होण्यास आता सुरु झाली असून, शुक्रवारी मुंबई १९.६, पुणे १३.३, बारामती १४, बीड आणि उस्मानाबाद १४, परभणी १३.४, जळगाव १४.५,  नाशिक १४.२, गोंदिया ८.५, नागपूर १३.५ अशा किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासांत किमान तापमानात आणखी घसरण नोंदविण्यात येत असल्याने राज्याचे हे किमान तापमान आणखी खाली येईल.

मुंबईचा विचार करता मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर दाखल झाले आहे. कमाल तापमानदेखील २८ अंशावर घसरले आहे. सोमवारपासून यात आणखी घसरण नोंदविण्यात येईल. नाताळच्या सरतेशेवटी मुंबई १५ अंशावर दाखल होईल. परिणामी मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

-----------------

येत्या सोमवारपासून मुंबई ठाण्यासह कोकण विभागातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हे किमान तापमान १८ ते २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. तर संपुर्ण महाराष्ट्राचा विचार करता हे किमान तापमान १२ ते १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.

- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग 

टॅग्स :हवामानमुंबईमहाराष्ट्र